
(प्रतिनिधी) शेख रमजान
सोशल मीडियावरील एका क्षुल्लक स्टेटसचे रूपांतर गंभीर हाणामारीत होऊन एका तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना ढाणकी येथे घडली आहे. मित्राचा वाढदिवस साजरा करत असताना आरोपींनी जुन्या वादाचा राग मनात धरून धारदार चाकूने केलेल्या हल्ल्यात ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी बिटरगाव पोलीस ठाण्यात तब्बल १३ जणांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षद संतोष खटके (वय १८, रा. ढाणकी) हा संत गाडगे बाबा कॉलेजमध्ये ११ वीत शिकतो. सोमवार, दि. ८ जून रोजी दुपारी आरोपी अमन पठाण याने आपल्या इन्स्टाग्राम आयडीवर हाताला सलाईन लावल्याचे एक स्टेटस ठेवले होते. त्यावर हर्षदने ‘स्माईल’ची इमोजी पाठवल्यामुळे दोघांमध्ये ऑनलाईन वाद झाला होता.त्याच दिवशी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास हर्षद आणि त्याचे इतर मित्र ढाणकी येथील सहारा पार्क येथे त्यांचे मित्र गोलू गिरी याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमले होते. त्यावेळी दुपारी झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी मुख्य आरोपी धम्मदिप संजय काळबांडे याच्यासह १० जण चार मोटारसायकलवरून सहारा पार्क येथे आले. त्यांनी हर्षदसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढत गेल्याने धम्मदिपने फोन करून त्याच्या आणखी ३ मित्रांना घटनास्थळी बोलावून घेतले.हर्षदने दुपारच्या प्रकरणावरून त्यांची माफी मागितली, परंतु आरोपींनी ऐकले नाही. आरोपी सुरज काळबांडे याने हर्षद व त्याच्या मित्राला कानाखाली मारली. यावेळी गोलू गिरी हा वाद सोडवण्यासाठी मध्ये पडला असता, आरोपी धम्मदिप काळबांडे याने कमरेचा चाकू उपसून “तुम्हाला एक-एक करून खतमच करतो” अशी धमकी देत थेट गोलूच्या मानेवर चाकूने जीवघेणा वार केला. यामध्ये गोलू गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला.
बचाव करायला गेलेल्यांवरही हल्ला:
गोलूला वाचवण्यासाठी धावलेला मित्र ओमकार भुसावळे याच्या पाठीवर आरोपी धम्मदिपने चाकूने वार केले. तसेच फिर्यादी हर्षद याच्या डाव्या बरगडीवरही चाकूने वार करून त्याला जखमी केले. त्याच वेळी रस्त्यावरून पोलिसांची गाडी येत असल्याचे दिसताच सर्व आरोपी पाच मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाले.
जखमी गोलू गिरी आणि ओमकार भुसावळे यांना तातडीने ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी उमरखेड येथे रेफर केले आहे.
या घटनेनंतर हर्षद खटके याच्या जबानी रिपोर्टवरून बिटरगाव पोलिसांनी मुख्य आरोपी धम्मदिप संजय काळबांडे, सुरज काळबांडे, मोहन काळबांडे, सुनील काळबांडे, मेधन काळबांडे, सम्यक काळबांडे, अजय काळबांडे, अनिकेत काळबांडे, गोपाल रावते, अमन बुरेखान पठाण, रंजित वाढवे, पवन कांबळे आणि शेख असलम (सर्व रा. सावळेश्वर, मन्याळी व बिटरगाव) अशा १३ जणांवर भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १०९(१) (खून करण्याचा प्रयत्न), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ११५(२), ३५१(२), ३५१(३) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या गुन्हा नोंद होताचा सर्व आरोपीना अटक केली सदर ची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. कुमार चिंता अपर पोलीस अधिक्षक मा. अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड मा. हनुमंत गायकवाड यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पांडुरंग शिंदे पोउपनी सागर अन्नमावर पोहेका रवी गिते,दत्ता हिंगडे, सतीश परतके,राहुल सोळंके, मोहन चाटे, अर्जुन राठोड,पोका हिंमत जाधव, प्रकाश मुढे, इम्रान खान, सुदर्शन जाधव, शरद चव्हाण, प्रवीण जाधव,अंबादास गारुळे,दत्ता कवडेकर, प्रकाश केंद्रे यांनी तात्काळ आरोपी अटक केले,
पोलीस ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सब-इन्स्पेक्टर सागर अन्नमव पुढील तपास करत आहेत. क्षुल्लक सोशल मीडिया रील आणि स्टेटसवरून तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळत असल्याबद्दल परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.
