सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोलापूर जिल्ह्यातून आपल्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. ज्या लोकसभा मतदारसंघातून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती, त्या माढा (Solapur) तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आज आढावा घेतला. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी येथील तुळशी गावातील शेतकऱ्यांनी गाव विकायला काढल्याचे बॅनर झळकावले होते, त्या गावातही शरद पवारांनी भेट दिलीय. त्यामुळे, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे आज शेतकऱ्यांच्या (Farmers) बांधावर त्यांच्याशी संवाद साधताना दिसले.

सन 1972 साली असाच दुष्काळ होता, तेव्हा मी सोलापूर जिल्ह्याचा पाकलमंत्री होतो. त्यामुळे, सरकारकडून शेतकऱ्यांना जमेल ती मदत त्याकाळी आम्ही केल्याची आठवण सांगत शरद पवारांनीही स्वत: देखील तुळशी गावातील पाणीटंचाई जाणून घेत थेट 50 लाख रुपयांची मदत देऊ केली. शरद पवारांनी सोलापूरच्या दुष्काळी परिस्थितीसाठी 50 लाखांच्या मदतीचा धनादेश खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. तसेच, राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा बारामतीमध्ये येतील तेव्हा खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना शेतकऱ्यांच्या अडचणी मांडण्याबाबत वेळ देणार असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं. मराठवाड्याचा दुष्काळी दौरा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. तर, एक महिन्यापूर्वीच आपण दुष्काळी परिस्थितीवर काय उपाययोजना करावी लागेल हे मुख्यमंत्र्यांना लेखी दिल्याचेही शरद पवारांनी सांगितले.