नंदुरबार शहरासह जिल्ह्यात आयकर विभागाच्या धाडी, व्यापारी झाले नॉट रिचेबल

प्रतिनिधी: चेतन एस.चौधरी

नंदुरबार – नंदुरबार शहरातील बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक यांच्यावर आयकर विभागाने (Income Tax Raid in Nandurbar) छापेमारी केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जवळपास नऊ ते दहा ठिकाणी आयकर विभागाकडून व्यावसायिकांच्या निवासस्थानी आणि व्यापारी प्रतिष्ठानाची झाडाझडती घेतली जात आहे. नाशिक आणि औरंगाबाद येथील आयकर विभागाच्या पथकांकडून ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. मात्र आयकर विभागाकडून याबाबत अधिकृतरित्या कुणीही बोललेले नाही. (Income tax department raids businessmens shops) पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या या कारवाईसाठी पोलीसांची कुमकही बाहेरील जिल्ह्यातून बोलावण्यात आली आहे. नंदुरबार शहरातील ९ नामांकित व्यक्तींकडे व त्यांच्या आस्थापनांमध्ये तपासणी सुरू असल्याचे आढळून आले. नाशिक आणि औरंगाबाद येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक अशा तऱ्हेने धडकलेले पाहून अनेकांचे धाबे दणाणले. आयकर विभागाच्या धाडीमुळे पसरलेल्या या वार्तेमुळे शहरातील बडे व्यावसायिक चांगलेच हादरले आहेत
नंदुरबारात आयकर पथकांनी अचानक धाड टाकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्थात हे पथक केंद्रातील आहे की, राज्य स्तरावरील आहे याची स्पष्टता अधिकृतपणे झालेली नाही. परंतु कागदपत्रांची नोंदींची व दप्तराची झाडाझडती घेतली जात असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे.