अनियमित पाणी पुरवठ्याने नागरिक त्रस्त, अधिकारी ठेकेदार सुस्त,एम आय एम चे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार

वरोरा शहरातील पाणी पुरवठा मागील काही दिवसापासून अनियमित असल्याने शहरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाण्याची पाईप लाईन मध्ये कोणताही बिघाड आल्यास जनतेला पाणी पुरवठा होणार नाही यासाठी पूर्वसूचना देण्यात येत नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. शहराचा पाणी पुरवठा बंद असल्यास टँकर ने पाणी पुरवठा करण्यात येत नाही तसेच टँकर आलाच तर वेळेत पाणी मिळत नाही.
वरोरा शहरातील पाणी पुरवठ्याच्या समस्येविषयी वेळोवेळी मुख्याधिकारी नगर परिषद वरोरा यांना माहिती दिली असता केवळ आश्वासन देत वेळ काढू पणा करतात असा आरोप एम आय एम चे तालुकाध्यक्ष मुज्जमिल शेख यांनी केला आहे.नगर परिषदेतील पाणी पुरवठा करणारा ठेकेदार व नगर परिषद प्रशासन नागरिकांच्या समस्यांना गांभीर्याने घेत नसल्याने अखेर जिल्हाधिकारी चंद्रपूर याना वरोरा शहराला होणारा अनियमित पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जातीने लक्ष देत चौकशी करण्याची विनंती एम आय एम वरोरा चे तालुकाध्यक्ष मुज्जमिल शेख यांनी केली आहे.

वेळोवेळी पाणीपुरवठा स्थगित होणे ,कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी पुरवठा बंद करणे, दवंडी न देणे यासारख्या समस्यांनी वरोरा शहर वासीयांना मानसिक त्रास होत आहे .अधिकारी व ठेकेदार यांचे साटेलोटे असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.समस्या लवकर न सोडविल्यास एम आय एम तीव्र आंदोलन करेल.

मुज्जमिल शेख

तालुकाध्यक्ष
एम आय एम वरोरा