
सहसंपादक : रामभाऊ भोयर
जागतिक महिलादिनी जगभर स्त्रीच्या कर्तृत्वाचे पोवाडे गायले जातात. तो दिवस संपतो आणि पुन्हा पुरुषांच्या त्याच नजरा चुकवत स्त्री कामासाठी घराबाहेर पडते, किंवा दैनंदिन कामकाजात रमून जाते. पुन्हा स्त्रीवरील अत्याचाराच्या कहाण्या ऐकायला मिळतात. मग प्रश्न असा पडतो, की खरंच स्त्री स्वतंत्र झाली आहे का? जगातिक महिला दिन केवळ साजरा करण्यापुरता मर्यादित राहिला आहे का? अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.
आज शाळेत गेलेली मुलगी सुरक्षित घरी येईल की नाही यांची चिंता पालकांना असते. खेळायला जाणारी इवलीशी पोर कुणाच्यातरी वासनांधतेचा बळी ठरेल का हा प्रश्न सतत पालकांना भेडसावत असतो. महाविद्यालयाच्या वाटेवर आपल्या तरूण मुलीची छेड काढली तर काय करायचे या विवंचनेत अनेक पालक आहेत. नोकरीसाठी घराबाहेर पडणारी मुलगी नराधमांच्या विळख्यात अडकणार नाही ना या विचाराने अनेक पालक अस्वस्थ असतात. लग्न करून सासरी पाठवलेल्या मुलीला अत्याचार सहन करावे लागू नयेत यासाठी पालकांचा आटापिटा सुरू असतो. तर काही मुली स्वतःच्याचं घरात सुरक्षित नाही, कधी वडील तर कधी चुलता,कधी भाऊ या नात्यात देखील आता काही ठिकाणी फक्त वासना आहेत, त्या वासनेला त्या बळी पडताय.वयाच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रियांवरील हिंसा हा गंभीर सामाजिक प्रश्न बनला आहे. स्त्रियांवरील अत्याचार व त्यातून होणारी त्यांची हिंसा याबाबत समाजात घडणाऱ्या घटनांचा आलेख इतका वाढत आहे की, भविष्यात भयमुक्त समाज आस्तित्वात आला तरच स्त्री व पर्यायाने तिचे कुटुंब सुरक्षित असेल.
“यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:” असे आपल्या संस्कृतीत म्हटले जाते. स्त्री म्हणजे केवळ एक व्यक्ती नसून ती शक्ती, सहनशीलता आणि प्रेमाचे प्रतीक आहे. आपल्या कुटुंबाचा कणा असलेली स्त्री आज सर्वच क्षेत्रांत प्रगती करत आहे. या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यासाठी जगभरात ८ मार्च रोजी ‘जागतिक महिला दिन’ साजरा केला जातो.
जागतिक महिला दिन हा केवळ एका दिवसाचा कार्यक्रम नसून, तो वर्षभर राबवण्याचा एक विचार आहे. ‘स्त्री’ ही निसर्गाची सर्वात मोठी शक्ती आहे. तिला सवलती नको आहेत, तर तिला समान संधी हवी आहे. तिला आरक्षणापेक्षा अधिक सन्मानाची गरज आहे. “Rights. Justice. Action. For ALL Women and Girls” या मंत्राचा अवलंब करून आपण असा समाज घडवूया जिथे लिंगभेद हा केवळ शब्दापुरता उरेल आणि प्रत्येकाची प्रगती त्याच्या कौशल्यानुसार होईल.
स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा, हा विचार, ही भूमिका म्हणजे ‘फक्त बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात’ असेच म्हणावे लागेल. त्यामुळे केवळ आर्थिक तरतुदी व नवनवीन योजनांमुळे महिलांचा विकास साध्य होणार नाही, तर महिला विकासासाठी पोषक सांस्कृतिक वातावरण अत्यंत गरजेचे आहे. शाश्वत विकासासाठी प्रयत्न होणे, तसेच दीर्घकालीन योजना करणे गरजेचे आहे. तरच खऱ्या अर्थाने ‘जागतिक महिला दिन’ सामाजिक बदलाची नांदी ठरेल!!!
२०२६ च्या या महिला दिनानिमित्त संकल्प करूया की, आपण आपल्या घरातील, कार्यालयातील आणि समाजातील प्रत्येक स्त्रीचा आदर करू, तिचे हक्क मान्य करू आणि तिला तिचे आकाश शोधण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य देऊ.
महिला दिनाचा खरा अर्थ तेव्हाच सार्थ होईल, जेव्हा आपण केवळ एका दिवशीच नाही, तर वर्षाचे ३६५ दिवस महिलांचा आदर करू. “
अँड.जयश्री बी सोनवणे
(पत्रकार,कवयित्री)
सोजाई आदिवासी महिला विकास फाऊंडेशन (सचिव)
