
पर्यावरण रक्षणासाठी पांढरकवड्यात हरित संकल्प
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जंगोदाई पेनठाणा टेकडी, पांढरकवडा येथे ८५ नारळाच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक बहुउद्देशीय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊराव मरपे होते. यावेळी आर्णी-केळापूर मतदारसंघाचे आमदार राजूभाऊ तोडसाम, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ख्वैया डोंगरे, वन विभागाचे उपवनसंरक्षक यशवंत बहाळे, उद्योजक पी. एल. कुमरे, अॅड. अशोकराव पाटील, बंडूभाऊ सोयाम यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते नारळाच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून प्रत्येकाने वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या उपक्रमासाठी वन विभाग, सामाजिक बहुउद्देशीय व्यवस्थापन समिती, जंगोदाई मॉर्निंग ग्रुप तसेच विविध सामाजिक संघटनांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमास परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, युवक व पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले.
