यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
महसूल विभागाने विविध शासकीय दाखल्यांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी केली असली, तरी नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशिक्षण देऊनही केंद्रचालकांना नवीन जीपीआर सिस्टीम हाताळताना अडचणी येत आहेत. त्यामुळे शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे जातीचे दाखले, नॉन-क्रिमिलेअर आणि रहिवासी प्रमाणपत्रे रखडली असून, विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. प्रशासनाने या तांत्रिक त्रुटी तातडीने सुधाराव्यात, अशी मागणी होत आहे.
राज्य शासनाने ‘गव्हर्नन्स प्रोसेस री-इंजिनिअरिंग’ अंतर्गत महसूल विभागाच्या दाखल्यांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या आणि मंजुरीचे स्तर कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मात्र, या नवीन प्रणालीच्या माहितीचा अभाव आणि ‘महाऑनलाइन’ अॅप सतत डाऊन असल्यामुळे नागरिकांना दाखले मिळवण्यास अडचणी येत आहेत. सध्या शैक्षणिक प्रवेशाचा काळ सुरू असल्याने जात, उत्पन्न, रहिवासी, नॉन-क्रिमिलेअर आणि अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी सेतू व ऑनलाइन केंद्रांवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे. शासनाने पहिल्या टप्प्यात वय, राष्ट्रीयत्व, उत्पन्न आणि अल्पभूधारक प्रमाणपत्रासह ६ महत्त्वाच्या सेवांचे सुलभीकरण केले असून, संपूर्ण राज्यात एकच प्रमाणित नमुना लागू केला आहे. हे सुधारित अर्ज ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध आहेत. परंतु, प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना ऑनलाइन केंद्रचालकांना नवीन सिस्टीम हाताळण्यात अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे, केंद्रचालकांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले असले, तरी तांत्रिक त्रुटींमुळे काम ठप्प होत आहे. त्यातच महाऑनलाइनचा सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने अर्ज अपलोड करणे आणि मंजुरीची प्रक्रिया रखडली आहे. शासनाचा हा निर्णय कागदपत्रांचा वेळ वाचवणारा आणि पारदर्शक असला, तरी ऐन गरजेच्या वेळी तांत्रिक गोंधळ उडाल्याने सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाया जात आहे. प्रशासनाने या तांत्रिक अडचणी तत्काळ सोडवून दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
मुख्य अडचणी आणि आव्हाने
सध्या शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून विद्यार्थी कागदपत्रांसाठी धावपळ करताना दिसत आहे. कागद पत्रांची ऑनलाइन प्रक्रिया करत असताना सर्व्हरवर प्रचंड ताण असतो. त्यातच महा ऑनलाइनचे अॅप वारंवार डाऊन होत असल्याने केंद्रचालक आणि नागरिक दोघांचाही वेळ वाया जात आहे.
कागदपत्रांची संख्या कमी झाली असली, तरी नवीन प्रणालीमध्ये नेमके कोणते बदल झाले आहेत आणि अर्ज कसा हाताळायचा, याबाबत काही केंद्रचालकांमध्ये अजूनही संभ्रम आहे.
सेतू केंद्र चालक गणेश काळे,सुरज भगत,सचिन त्रिपदवार
