
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
येथे तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास
व धूम्रपानास सक्त मनाई आहे. नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई होईल, असे मोठे आणि आकर्षक फलक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागावर डौलाने मिरवताना दिसतात. मात्र, या फलकांच्या अगदी खाली आणि कार्यालयाच्या कोपऱ्या-कोपऱ्यात मारलेल्या गुटख्याच्या लालभडक पिचकाऱ्या पाहिल्यावर साहेब, येथे नियम पाळतंय कोण? असा संतप्त सवाल विचारण्याची वेळ सर्वसामान्य
नागरिकांवर आली आहे.
सर्वसामान्यांना शिस्त शिकवणारे अधिकारी कर्मचारीच स्वतः या नियमांना केराची टोपली दाखवत असल्याने राळेगाव शहरातील असलेल्या शासकीय कार्यालयांना विद्रुपतेचे ग्रहण लागले आहे.
राळेगाव शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि जिथे दररोज हजारो नागरिकांची ये-जा असते, अशा सर्वच प्रशासकीय कार्यालयांमध्ये हे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच पंचायत समिती, यासह आदी अशा अनेक कार्यालयांच्या पायऱ्या, इमारतींचे कोपरे, खिडक्यांच्या खालचा भाग केबिनच्या बाहेरील भिंतीही थुंकीने रंगलेल्या आहेत.
नियम केवळ कागदावर; अंमलबजावणी शून्य
शासकीय नियमांनुसार सार्वजनिक आणि शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू खाणे किंवा थुंकणे हा कायदेशीर गुन्हा समजला जातो आणि यासाठी दंडाचीही तरतूद आहे.
मात्र, वशिल्याच्या किंवा स्वतःच्याच कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार कोण, हा मोठा प्रश्न आहे. वरिष्ठ अधिकारी या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे धाडस अधिकच वाढले आहे.यामुळे कार्यालयात येणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सुजाण जनतेला कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत असून परिसरात दुर्गंधीही पसरत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तंबी देण्याची गरज
कार्यालयांचे हे विद्रुपीकरण थांबवायचे असेल, तर आता केवळ फलक लावून भागणार नाही. प्रत्येक कार्यालयाच्या प्रमुखांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या अधिनस्थ काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कडक तंबी देणे गरजेचे आहे.तसेच कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जावी. तंबाखू खाऊन भिंती घाण करणाऱ्यांवर तत्काळ जागेवरच दंडात्मक कारवाई करावी. ‘अगोदर कर्मचाऱ्यांनी नियम पाळावेत, मग जनतेला सांगावे’ ही भूमिका प्रशासनाने घ्यावी. आता राळेगावचे वरिष्ठ प्रशासन या थुंकीबहाद्दरांना लगाम घालणार की स्वच्छ भारत अभियानाचा असाच बोजवारा उडू देणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
