
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
उमरखेड येथील बजरंग दलाचे गौरक्षक कार्यकर्ते स्व. गजानन मारोती सुरोशे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर गुन्हे दाखल करून तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी राळेगाव बजरंग दलाच्या वतीने मा. तहसीलदार अमित भोईटे यांना निवेदन देण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, महागाव येथील रहिवासी तथा बजरंग दलाचे गौरक्षक कार्यकर्ते स्व. गजानन मारोती सुरोशे यांची दिनांक २३ मे २०२६ रोजी रात्री अंदाजे ११.४० वाजताच्या सुमारास अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. बिजोरा टोल नाक्याजवळ गोवंश तस्करी करणारे पिकअप वाहन क्रमांक MH-२९-BE-८९१५ संशयास्पदरीत्या जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यानंतर गोरक्षक महेश उत्तमराव सुरोशे, नारायण करमोटकर, निलेश विलास झाडे व इतर कार्यकर्ते त्या वाहनावर लक्ष ठेवून होते.
दरम्यान, संशयित वाहन चालकाने टोल नाक्यावरील गेट तोडून उमरखेडच्या दिशेने पळ काढला. त्यावेळी महेश सुरोशे यांनी आपल्या मित्रासोबत मोटारसायकलवरून वाहनाचा पाठलाग सुरू केला. त्यांच्या मागे गजानन सुरोशे हे सुझुकी कंपनीच्या एस-क्रॉस वाहन क्रमांक MH-१२-PT-८६३४ मधून पाठलाग करत होते. घाट परिसरात आरोपी वाहन चालकाने मुद्दाम मोटारसायकलला कट मारल्याने महेश सुरोशे हे डिव्हायडरवर आदळून खाली पडले.
ही घटना पाहिल्यानंतरही गजानन सुरोशे यांनी धाडस दाखवत गोवंश तस्करी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग सुरूच ठेवला. पुढे सुकळी गावाजवळ सदर पिकअप वाहन थांबविण्यात आले. तेथे आधीपासून दबा धरून बसलेल्या आरोपींनी गजानन सुरोशे यांच्या वाहनावर पुढून व मागून मोठमोठ्या दगडांनी आणि लाकडांनी सामूहिक हल्ला केला. या हल्ल्यानंतर आरोपींनी वाहनातील अंदाजे ११ ते १२ गोवंश खाली उतरवून घटनास्थळावरून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी गजानन सुरोशे हे गंभीर जखमी अवस्थेत वाहनाच्या मागील सीटवर आढळून आले. त्यांना तात्काळ उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथील यशोसाई हॉस्पिटल येथे हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, “हा हल्ला पूर्वनियोजित असून गोवंश तस्करांची वाढती दहशत चिंताजनक आहे,” अशी प्रतिक्रिया बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
निवेदनाद्वारे मुख्य आरोपी शेख सुल्तान शेख अल्लावली व त्याच्या साथीदारांवर भारतीय न्याय संहितेतील कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करून संघटित गुन्हेगारी अंतर्गत म.को.का. लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अंदाजे १५ ते २० आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करण्यात यावी, सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी आणि मृतकाच्या कुटुंबाला शासनामार्फत किमान ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
निवेदन देताना बजरंग दलाचे तालुका संयोजक जगदीश निकोडे, तालुका गौरक्षा प्रमुख युवराज देवकर, अंकित क्षीरसागर, अजय धतकर, सागर वर्मा, विनोद भाऊ क्षीरसागर, राजकुमार बघेल, कार्तिक केळवतकर, ध्रुप राऊत, साहिल देशमुख, साहिल खंडाळकर, चैतन्य डाखोरे, आदेश सोनटक्के तसेच अनेक गौरक्षक कार्यकर्ते उपस्थित होते.उमरखेड येथील गौरक्षक गजानन सुरोशे हत्या प्रकरणी राळेगावात संताप
