
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
वाडी पोड परिसराजवळ एका शेताच्या शेजारी एक इसम मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तीव्र उन्हाच्या तडाख्यामुळे या इसमाचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहदा येथील वाडी पोड जवळील एका शेताशेजारी एक व्यक्ती पडून असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलीस पाटील पीयुष गबराणी यांना दिली. माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, तो इसम मृत स्थितीत असल्याचे दिसून आले.
दोन दिवसांपासून होता बेपत्ता
मृतदेहाची ओळख पटवली असता, सदर इसम रुंझा येथील रहिवासी असून त्याचे नाव श्रावण विठ्ठल आत्राम (वय ३२ वर्षे) असल्याचे निष्पन्न झाले. श्रावण आत्राम हा गावोगावी फिरून भंगार गोळा करण्याचे काम करायचा. गेल्या दोन दिवसांपासून तो घरी परतला नव्हता, अशी माहिती समोर आली आहे. सध्या उन्हाचा पारा वाढलेला असल्याने, तीव्र उन्हामुळेच त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पोलीस तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच पांढरकवडा पोलीस ठाण्याचे रघुपती साहेब, जमादार दराडे आणि शिपाई काकडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला असून, मृतदेह उत्तर तपासणीसाठी (शवविच्छेदनासाठी) रुग्णालयात रवाना केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
