
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
गजबजलेल्या साप्ताहिक बाजार परिसरात भरदिवसा घडलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पांढरकवडा पोलिसांनी तत्पर तपास करत अवघ्या काही दिवसांत आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद शामराव कोरांगे (वय ३५) हे आपल्या मित्र भाऊराव मेश्राम यांच्यासह १२ मे रोजी मोहदा येथे साप्ताहिक बाजारासाठी आले होते. त्यांनी आपली मोटारसायकल क्रमांक एमएच २९ बीवाय ५८५७ ही बाजार परिसरातील एका कॉम्प्लेक्सजवळ उभी केली होती. त्यानंतर दोघेही बाजारातील खरेदीसाठी गेले.दरम्यान, सुमारे दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास खरेदी आटोपून ते मोटारसायकल ठेवलेल्या ठिकाणी परत आले असता गाडी जागेवर दिसून आली नाही. परिसरात शोधाशोध करूनही मोटारसायकल मिळून न आल्याने त्यांनी तात्काळ पांढरकवडा पोलीस स्टेशन गाठून चोरीची तक्रार दाखल केली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. बिट जमादार रविकांत दराडे यांनी तांत्रिक माहिती, स्थानिक चौकशी तसेच संशयितांच्या हालचालींची माहिती गोळा करत तपासाला गती दिली. अखेर या प्रकरणातील आरोपी मिलिंद डंभारे, रा. लोणी, ता. गडचांदूर, जि. चंद्रपूर याला पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पुढील चौकशी सुरू केली असून त्याला घाटंजी येथील न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पांढरकवडा पोलीस करीत आहेत.मोहदा बाजार परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. बाजारात येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करावीत तसेच सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
