
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
प्रवेशोत्सवानिमित्त तहसीलदार अमित भोईटे यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा (मुले), राळेगाव येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वाटप केले. नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
गटशिक्षणाधिकारी नवनाथ लहाने व विस्तार अधिकारी निलेश दाभाडे यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सावंगी येथे भेट देऊन प्रवेशोत्सव कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
यवतमाळ डायटचे अधिव्याख्याता पुनीत मातकर यांनी जिल्हा परिषद शाळा, लोहारा येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वितरण करण्यात आले. तसेच इयत्ता पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
तालुक्यातील विविध शाळांमध्ये शिक्षक, पालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, नव्या पुस्तकांचा सुगंध आणि नव्या शैक्षणिक वर्षाची उमेद यामुळे राळेगाव तालुक्यातील शाळांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
