
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव ग्रामीण : नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत उत्साह निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, किन्ही (ज.) येथे मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्या सौ. प्रीतीताई संजय काकडे उपस्थित होत्या. कार्यक्रमात इयत्ता पहिलीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले.
यावेळी सौ. प्रीतीताई काकडे यांनी आपल्या स्वखर्चातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना लेखनसाहित्य व नोटबुकचे वाटप करून विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सुनील भंडारे, सदस्य श्री. संदीप परसोडेकर, श्री. बहुभाऊ नागपुरे तसेच समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक श्री. गजानन टापरे यांच्यासह श्री. भूपेश मांडवकर, श्री. अमोल भोयर व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या शिक्षकांनी केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तसेच कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार मानण्यात आले.
