
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव येथील स्वर्गीय विजय जांभूळकर यांच्या चौदाव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कुटुंबीयांनी आणि आप्तस्वकीयांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणाचा उपक्रम राबविलाअसून पारंपरिक विधींना सामाजिक बांधिलकीची जोड देत मोक्षधाम परिसरात आंब्याचे रोप लावण्यात आले तसेच त्या रोपाच्या संरक्षणासाठी लोखंडी संरक्षक कवचही बसविण्यात आले.
दि. 23 जून 2026 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने विजय जांभूळकर यांचे आकस्मिक निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे जांभूळकर कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार असून, अजूनही कुटुंबीय या दुःखातून पूर्णपणे सावरलेले नाहीत. अशा भावनिक वातावरणात चौदाव्या विधीचे औचित्य साधून त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि समाजात पर्यावरण संरक्षणाचा सकारात्मक संदेश जावा, या उद्देशाने वृक्षारोपण करण्यात आले.मोक्षधाम परिसरात लावण्यात आलेले आंब्याचे रोप भविष्यात मोठ्या वृक्षाचे रूप धारण करून अनेकांना सावली, प्राणवायू आणि पर्यावरणाचा अमूल्य लाभ देईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. रोपाचे संगोपन आणि संरक्षण करण्याची जबाबदारीही कुटुंबीयांनी स्वीकारली.
आजच्या काळात स्मृतिदिन, पुण्यतिथी किंवा धार्मिक विधी केवळ पारंपरिक पद्धतीने न साजरे करता त्यातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची गरज आहे. वृक्षारोपणासारख्या उपक्रमातून दिवंगत व्यक्तीच्या स्मृती जपल्या जातात, पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागतो आणि समाजासमोर एक आदर्श निर्माण होतो. विजय जांभूळकर यांच्या चौदाव्या कार्यक्रमानिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.
