
सहसंपादक : रामभाऊ भोयर
गेल्या तीन दिवसांपासून गावातील वीज प्रवाह खंडित झाल्याने गावकऱ्यांमध्ये संतप्त वातावरण निर्माण झाले होते. दिवसरात्र वीज नसल्यामुळे ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिक, युवक व महिला मंडळी मोठ्या संख्येने गावातील वीज डीपीजवळ एकत्र जमले होते. वीज प्रवाह कायमस्वरूपी बंद करण्याचा विचारही ग्रामस्थांनी केला होता.
या वेळी संबंधित इंजिनिअर व लाईनमन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उद्धटपणाची वागणूक दिल्याने ग्रामस्थांचा संताप आणखीनच भडकला. नागरिक डीपी पेटवण्याच्या तयारीत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष जयंत कातरकर यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांनी नागरिकांना शांत केले व स्वतःहून संबंधित इंजिनिअरशी फोनवर चर्चा करून तातडीने वीज प्रवाह सुरू करून घेतला.
कातरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पुढे अशा प्रकारची वेळ नागरिकांवर ओढवू नये याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. अन्यथा ग्रामस्थ संतापाच्या भरात थेट वीज कार्यालयासह इतर ठिकाणी मोठे नुकसान करू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
या वेळी युवक नेते अक्षय खंडाळकर, मयूर तनिलवार, गोलू चांदेकर, बाबुराव कांबळे, मयूर खंडाळकर, उमा तोडसाम, कपिल भगत, प्रकाश राजूरकर यांच्यासह गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
