सहसंपादक : रामभाऊ भोयर
वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी येथील प्रकार संतापजनक व धक्कादायक आहे . फळबाग लागवडीसाठी चार महिन्यांपासून रखडलेले अनुदान कधी मिळणार एवढच साधं विचारण्यासाठी शेतकरी कृषि अधिकारी यांच्या कडे गेला होता मात्र त्याच वेळी मस्तवाल कृषी अधिकाऱ्याने थेट शेतकऱ्याला मारहाण केली. या मस्तवाल अधिकाऱ्याला निलंबितच नाही तर सेवेतून बडतर्फ करून अटक करावी व गुन्हे दाखल करून थेट जेलमध्ये याची रवानगी करावी. अशी मागणी युवा शेतकरी स्वप्निल वटाणे यांनी केली आहे.
हक्काचे पैसे कधी मिळतील हे विचारणे गुन्हा आहे काय?
‘शेतकरी सुखी तर जग सुखी’ असे आपण अभिमानाने म्हणतो, पण प्रत्यक्षात परिस्थिती मात्र याच्या उलट दिसतेय. स्वतःचे रक्त आटवून जगाचा पोशिंदा मातीत घाम गाळतो, तेव्हा कुठे आपल्या ताटात भाकरी येते. पण याच पोशिंद्याला जेव्हा सरकारी दप्तरी आपल्या हक्काच्या पैशांसाठी हेलपाटे घालावे लागतात आणि बदल्यात त्याला अधिकार्यांच्या लाथाबुक्क्या खाव्या लागतात, तेव्हा आपली लोकशाही जिवंत आहे का? असा प्रश्न पडतो. शेतकरी ऋषिकेश पवार यांच्यासोबत घडलेली घटना ही प्रशासकीय व्यवस्थेच्या मस्तवालपणाचा कळस आहे.
*प्रतिक्रिया*
“शेतकरी आधीच निसर्गाच्या लहरीपणाशी लढतोय, आणि आता त्याला सरकारी दरबारी न्यायासाठी मारहाण सहन करावी लागत आहे? ऋषिकेश पवार यांनी काही लाच मागितली नव्हती, तर स्वतःच्या हक्काचे फळबाग अनुदान मागितले होते. जर अधिकारी शेतकऱ्याला सन्मानाने वागणूक देऊ शकत नसतील, तर त्या खुर्चीवर बसण्याचा त्यांना अधिकार नाही. हा हल्ला केवळ ऋषिकेशवर नसून संपूर्ण शेतकरी वर्गाच्या अस्मितेवर आहे.”
शेतकरी हा या देशाचा कणा आहे. जर हा कणाच मोडण्याचा प्रयत्न सरकारी यंत्रणा करणार असेल, तर प्रगतीच्या गप्पा मारणे व्यर्थ आहे. ऋषिकेश पवार यांच्यासारख्या स्वाभिमानी शेतकऱ्याने विचारलेला प्रश्न हा केवळ त्यांच्या पैशांचा नाही, तर तो व्यवस्थेला विचारलेला जाब आहे. या घटनेचा निषेध केवळ शब्दांत करून चालणार नाही, तर संबंधित मुजोर अधिकाऱ्याला कायद्याचा हिसका दाखवून निलंबित करणे हीच ऋषिकेश यांना मिळालेली खरी न्यायची पावती ठरेल.
युवा शेतकरी स्वप्नील वटाणे
