
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शेतकरी आत्महत्यांची मरोभूमी ठरत असल्याची ओळख जगाच्या पटलावर निर्माण व्हावी हे इथल्या शेतकऱ्यांचं दुर्दैव. त्याला कारणीभूत ठरणारा घटक केवळ अस्मानी नाही तो सुलतानी सुद्धा आहे, हे वारंवार सिद्ध झालेलं. अलीकडच्या काळात अस्मानी संकटाची तीव्रता देखील अतिशय वेगाने वाढलेली, खरीप हातून गेल्यावर आता रब्बीवरही या संकटाचे वादळ भुंगावते आहे. या आठवड्यातील ढगाळ वातावरण ,गारपीठ या मुळे यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आल्याचे दिसते. ऐन चणा व गहू पीक सवंगणी च्या वेळी गारपीठ झाल्याने राळेगाव व वडकी परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे .
तीन दिवसाआधी ढगाळ वातावरण व त्यात गारपीठ चा फटका रबी हंगामातील हरभरा, तूर व भाजीपाला पिकांना बसला. झरगड येथे वीज कोसळून 5 जन जखमी झाले .वातावरण रोग व किडींना पोषक ठरत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या नव्या संकटापुढे शेतकरी हतबल झाल्याचे दिसते.
अगोदरच अवकाळी पावसामुळे खरिपात परवड होऊन वाताहत झालेली असताना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात व चालू वर्षात प्रारंभी ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगराईचे संकट पसरले. हरभरा, गहू तसेच भाजीपाला पिकावर मावा, बारीक किडे व अळींचे प्रमाण वाढल्याने औषध फवारण्याचा खर्चही वाढला आहे. त्यासोबत पुन्हा अधूनमधून अवकाळीची संक्रांत मानगुटीवर बसू लागली आहे. अवेळी पाऊस पडत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे सोयाबीनसारखे नगदी पीक मातीत गेले. उत्पादन झाले नाहीच, उलट पिकासाठी केलेला खर्चदेखील निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक गणित गडगडले. परिणामी, शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे.
राळेगाव व वडकी परिसरात झालेल्या गारपीठ व मुसळधार पावसाने पिकांची हानी केली .चणा मातीमोल झाला तर तूर पीक हातचे गेले .गहू अक्षरशः माना टाकल्याचे विदारक चित्र सेटशिवारात दिसू लागले आहे .चार-पाच दिवसांपासून आभाळ असल्याने थंडी कमी झाली. याचा परिणाम गहू, हरभरा, तूर व भाजीपाला पिकांवर परिणाम होत आहे. शेती करणे सध्या तरी परवडत नाही. त्यात आता निसर्ग साथ देत नसल्याने शेतकऱ्यांनी काय करावे, हेच कळत नाही. महागाई वाढली असून, त्या तुलनेत पिकांना भाव मिळत नाही. आता हवामान बदलाचा फटका पिकांना बसत आहे.
सुरू असलेल्या अधिवेशनात गारपीठ पंचनामे करण्याची मागणी झाली ,वराती मागून घोडे हा आपला प्रशासकीय खाक्या राहिल्याचा अनुभव आहे . शासकीय मदत शासकीय मदत कधी मिळणार याची कोणतीच शाश्वती नाही .कर्जमाफी चे भिजत घोंगडे तसेच पडून आहे . कोरडवाहू शेतीत कापूस सोयाबीनचा पैसा देनेकरांच्या हवाली होतो. अखेर शेतकऱ्यांच्या घरी उरते ती तूर. पुढील हंगामाची तजवीज करण्याकरता बहुदा तूर विक्रीतून आलेला पैसा कामी पडतो. यंदा मात्र ढगाळ वातावरण व गारपीठ यामुळे तूर उत्पादनात लक्षणीय घट येण्याची चिन्हे आहेत. तूर फुलोऱ्यावर असताना किडीचे आक्रमण, त्यानंतर अति पाऊस, अति थंडी व वातावरणाचा फार मोठा फटका तूर पिकाला बसला आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यामुळे झाले.
