
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील इंदिरा गांधी कला महाविद्यालयात २३ फेब्रुवारी २०२६ रोजी संत गाडगे बाबा जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छ भारत स्वस्थ भारत अभियान अंतर्गत दिवसभर स्वच्छता व जनजागृती पर उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता राळेगाव शहर बसस्थानक परिसरातील स्वच्छता मोहिमेने झाली. त्यानंतर शहरातील विविध भाग, ग्रामीण रुग्णालय परिसर, नगर पंचायत तलाव उद्यान तसेच महाविद्यालयीन परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी व रा.से.यो. स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून श्रमदान केले.
दुपारी आयोजित उद्बोधन सत्रात संत गाडगे बाबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. त्यांच्या स्वच्छता, समाजसुधारणा आणि शिक्षण प्रसाराच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यात आली. तसेच वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांचे प्रभावी सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. एल. बरडे उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. सतीश जाधव, प्रा. व्ही. डी. समर्थ यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. मोहनीश वानखडे तर सह-समन्वयक प्रा. भाग्यश्री लोहकर यांनी आयोजनाची जबाबदारी पार पाडली. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी, प्राध्यापकवृंद यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
या उपक्रमातून संत गाडगे बाबांचा स्वच्छतेचा आणि समाजप्रबोधनाचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.
