
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव अंतर्गत अंगणवाडी केंद्र पिंपळगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तसेच आदिशक्ती अभियान अंतर्गत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ हा जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात पिंपळगाव येथील अंगणवाडी सेविका कल्पना महाकुलकर यांच्या विशेष प्रयत्नातून गावातील किशोरवयीन मुलींनी “बालविवाहाचे दुष्परिणाम” या विषयावर प्रभावी नाटिकेचे सादरीकरण केले. या नाटिकेमधून बालविवाहामुळे होणारे सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक परिणाम प्रभावीपणे मांडण्यात आले.
नाटिकेमध्ये ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महसूल अधिकारी, वर-वधू, माता-पिता, भटजी, समाजसेविका व आचारी अशा विविध भूमिका साकारण्यात आल्या होत्या. त्यानंतर गावात रॅली काढून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. अल्पवयीन विवाहाचे दुष्परिणाम तसेच त्यासंदर्भातील कायद्यांची माहिती देत प्रचार-प्रसिद्धी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी बालविवाह न करण्याची सामूहिक शपथ उपस्थितांकडून घेण्यात आली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंगणवाडी सेविका कल्पना महाकुलकर व मदतनीस करिष्मा बेहरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमातील सहभागी सर्व किशोरवयीन मुलींचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. यावेळी मा. केशव पवार (गटविकास अधिकारी), मा. भारती इसळ (सहाय्यक गटविकास अधिकारी), मा. सागर विठाळकर (बाल विकास अधिकारी, राळेगाव) तसेच पर्यवेक्षिका पायल आत्राम, स्नेहा अनपट, धरती कोराम आणि वैशाली ठोके (ग्रामपंचायत अधिकारी, पिंपळगाव) यांनी संपूर्ण उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
