
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
देशातील प्रतिष्ठित “Success & Achievement of 40 Under 40 India 2026 Leaders” यादीमध्ये राळेगाव येथील युवा उद्योजक हृषीकेश मेंडोले यांनी यंदा 11 व्या क्रमांकावर झेप घेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मागील वर्षी ते 12 व्या क्रमांकावर होते. त्यांच्या या यशामुळे राळेगाव तालुक्यासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या यवतमाळच्या मातीतूनही राष्ट्रीय स्तरावरील कर्तृत्ववान युवा नेतृत्व घडू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण हृषीकेश मेंडोले यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे. संधी मिळाल्यास विदर्भातील युवक कोणत्याही क्षेत्रात देशपातळीवर आपला ठसा उमटवू शकतात, याची प्रचिती त्यांच्या यशातून येत आहे.
हृषीकेश मेंडोले यांचे प्राथमिक शिक्षण राळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आपला मार्ग तयार केला. माध्यमिक व उच्च शिक्षण त्यांनी नाशिक आणि पुणे येथे पूर्ण केले. त्यानंतर उद्योग क्षेत्रात प्रवेश करून स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी मोठी भरारी घेतली.
आज देशातील आघाडीच्या 40 वर्षांखालील युवा उद्योजकांच्या यादीत त्यांचा समावेश होणे ही केवळ त्यांची वैयक्तिक उपलब्धी नसून राळेगाव तालुका आणि यवतमाळ जिल्ह्यासाठीही अभिमानाची बाब मानली जात आहे.
हृषीकेश मेंडोले यांच्या या यशाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, तालुक्यात आणि जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील युवकांना प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
