रस्त्यावर असलेल्या खड्याने नागरिक त्रस्त,मोहगव्हाण रस्त्याच्या कामासाठी मनसेचे अर्धनग्न आंदोलन


वाशिम – वाशिम ते मोहगव्हाण रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थांना अतोनात त्रास होत असून सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या मार्गदर्शनात तसेच महाराष्ट्र सैनिक पवन डुबे यांच्या नेतृत्वात सोमवार, २९ ऑगष्ट रोजी मोहगव्हाण रस्त्यावर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.
मोहगव्हाण गावाला जोडणारा हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असून सदर रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून ग्रामस्थांना या रस्त्यावरुन धड चालणेही कठीण होवून बसले आहे. पावसाळ्यात खड्डयात पाणी साचत असून खड्डयाचा अंदाज न आल्यामुळे अनेक दुचाकींचा अपघात होवून ग्रामस्था जायबंदी झाले आहेत. सदर रस्त्याच्या नविनीकरणाचे काम त्वरीत हाती घेण्यात यावे या मागणीसाठी मनसेच्या वतीने अनेकवेळा जि.प. बांधकाम विभागाला निवेदने देण्यात आली होती. मात्र प्रत्येक वेळेस कोरडे आश्वासन देण्याखेरीज या विभागाने काहीही केले नाही. शेवटी दिलेल्या आंदोलनाच्या इशार्‍यानुसार मनसेने मोहगव्हाण रस्त्यावर अर्धनग्न आंदोलन राबविले. यावेळी जि.प. बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनाची दखल घेवून जि.प. चे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना मागण्यांचेे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात मनसे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे, महिला सेना जिल्हाध्यक्षा सिता धंदरे, तालुकाध्यक्ष विठ्ठल राठोड, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष रघुनाथ खुपसे, शहर उपाध्यक्ष प्रतिक कांबळे, शाखा उपाध्यक्ष आकाश जिरवणकर, सोनु दिलदार, दामोदर राठोड, राघोजी कोरडे, नजीर नाडावाले यांच्यासह असंख्य मनसे कार्यकत्यार्र्ंनी सहभाग घेतला होता. आंदोलनस्थळी ग्रामीणचे पीएसआय रमेश पाटील व कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु न झाल्यास मनसेच्या वतीने जि.प. बांधकाम विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा मनिष डांगे यांनी यावेळी दिला.