धक्कादायक ! शासकीय आदिवासी आश्रमशाळा मुख्याध्यापक व शिक्षकाविना

8

सहसंपादक:- रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यात किन्ही (जवादे) येथे आदिवासी विकास विभागाची एकमेव शासकीय आदिवासी आश्रमशाळा आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे सद्यस्थितीत या आश्रमशाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एकही शिक्षक व मुख्याध्यापक तसेच एकही चतुर्थ श्रेणी कर्मचारी नाहीत.

३० जून पासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार आहे.परंतु मुख्याध्यापक व एकही शिक्षक नाही तर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण ? हा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांना पडलेला आहे.आमची मुले शाळेत कोणाच्या भरवशावर पाठवायची? शिकवण्यासाठी शिक्षकच नाही त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हमखास होणार आहे. याची सर्वस्वी जबाबदारी कोण घेणार ? असा प्रश्न उपस्थित करीत प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी समस्यांची तात्काळ दखल घेऊन त्वरित शाळेला मुख्याध्यापक व शिक्षक द्यावे. अशी मागणी अपर आयुक्त,आदिवासी विकास विभाग अमरावती यांना ट्रायबल फोरम तालुका शाखा राळेगाव, विद्यार्थ्यांचे पालक व परिसरातील आदिवासी बांधवांनी केली आहे .

या रिक्त पदासंदर्भात ट्रायबल फोरम शाखा राळेगावचे पदाधिकारी आणि पालकांनी १६ मे रोजी अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावती यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. त्यांनी संघटनेला व पालकांना आश्वासन दिले की. येत्या काही दिवसांनी कर्मचा-यांची बदली प्रक्रिया आहे. तेव्हा शाळेच्या सर्व रिक्त जागा बदलीने भरतो. उन्हाळ्यात बदली प्रक्रिया पूर्ण झाली. तरी त्यांनी आश्रम शाळेतील रिक्त असलेली शिक्षकांची पदे भरली नाहीत. उलट पुर्वी कार्यरत असलेल्या चार शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करुन आश्रमशाळाच मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांविना रिकामी करुन ठेवली आहे.

किन्ही(ज) हे गांव आदिवासी उपाय योजना क्षेत्रात येत असल्यामुळे येथे बदली करून येण्यास कोणताही कर्मचारी इच्छुक नसतो.आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या नुकसानीस अपर आयुक्त जबाबदार असल्यास आरोप आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे.

आश्रम शाळेला कुलूप ठोकणार
आश्रमशाळा ३० जूनपासून सुरु होणार आहे. शाळेला मुख्याध्यापक, शिक्षक व चतुर्थ कर्मचारी तात्काळ उपलब्ध करुन न दिल्यास आश्रम शाळेलाच कुलूप ठोकणार आणि पालकांना घेऊन अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावती येथे ठिय्या आंदोलन करणार असा इशारा ट्रायबल फोरम शाखा राळेगाव तालुकाध्यक्ष शंकर पंधरे यांनी दिला आहे.