
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील बोरी-इचोड एका २२ वर्षीय तरुणीचे इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार करून अश्लील मेसेज केल्याचा धक्कादायक प्रकार फिर्यादीने वडकी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून उघडकीस आला. याप्रकरणी वडकी पोलिसांनी पिता-पुत्रावर गुन्हा दाखल केला. प्रज्वल लिचोडे (१९) व संजय लिचोडे (५०) (दोघेही रा. बोरी-इचोड, ता. राळेगाव) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर मुलीच्या नावाने बनावट अकाउंट काढून अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केला. ही मुलगी या प्रकाराबाबत प्रज्वलच्या वडिलांना विचारपूस करण्याकरिता त्यांच्या घरी गेली असता प्रज्वलचे वडील संजय लिचोडे यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.याबाबतची तक्रार मुलीने वडकी पोलिसांत दिली. यावरून पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपी पिता-पुत्रावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा सहकलम, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजणे करीत आहेत.
