
सहसंपादक :: रामभाऊ भोयर
सैनिक पब्लिक स्कूल, वडकी येथे २३ व २४ जुलै २०२५ रोजी रमण सायन्स सेंटर, नागपूर यांच्या वतीने फिरत्या विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. विज्ञानाविषयीची गोडी निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष रणधीर सिंह दुहन, सचिव सत्यवान सिंह दुहन तसेच प्राचार्य सचिन ठमके (रिसोर्स पर्सन – सी.बी.एस.ई) यांची उपस्थिती लाभली.
इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनीत सहभाग घेतला आणि विविध विज्ञान उपकरणे, प्रात्यक्षिके तसेच शास्त्रीय संकल्पनांचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाण व प्रयोगशीलता वाढविण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.याप्रसंगी प्राचार्य सचिन ठमके सरांनी विद्यार्थ्यांना आरोग्य, स्वच्छता आणि त्यासंबंधित आवश्यक काळजी घेण्याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेत सकारात्मक प्रतिसाद दिला.या उपक्रमामुळे शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध झाले असून, भविष्यातही असे उपक्रम राबविण्यात यावेत, अशी विद्यार्थ्यांची आणि पालकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती.
