सहसंपादक : – रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील ४६ सेवा सोसायट्यांचा कारभार सध्या केवळ २० सचिवांकडून सांभाळला जात असून, त्यामुळे संबंधित सचिवांवर प्रचंड प्रमाणात कामाचा ताण निर्माण झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, सचिव संघटनेकडून रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी केली जात आहे.ग्रामीण भागातील सेवा सोसायट्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आर्थिक आधार असून, पीककर्ज तसेच मध्यम मुदतीचे कर्ज या संस्थांमार्फत वितरित केले जाते. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गरजा भागतात व उत्पन्नातून संस्थांना परतफेड केली जाते.
सचिवांच्या कमतरतेमुळे तणाव
सध्या तालुक्यात ४६ सेवा सोसायट्या अस्तित्वात असून त्यापैकी केवळ ६ सचिव केडरद्वारे नियुक्त आहेत, तर उर्वरित १४ सचिव संस्था पातळीवर नियुक्त झाले आहेत. केडर सचिवांकडे प्रत्येकी ५ ते १० सोसायट्यांचे कामकाज असून, एका सचिवावर ३०० ते ५०० सभासद असलेल्या सुमारे ५ हजार सभासदांचे काम सांभाळण्याची वेळ येत आहे.
संगणकीकरणामुळे कामाचा भार वाढला
शासनाच्या संगणकीकरण योजनेअंतर्गत तालुक्यातील आठ संस्थांना आधीच संगणकीय प्रणाली प्राप्त झाली असून, त्यांचे संपूर्ण दस्तऐवज ऑनलाईन करण्यात आले आहेत. आता नऊ नवीन संस्थांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. संगणकीकरणानंतर संस्थांना तीन व्यवसाय सुरू करण्याचे निर्देश असून, यासाठी संस्थांचे प्रतिनिधी इतर तालुक्यांतील प्रगत संस्थांचा अभ्यासही करत आहेत.
मानसिक तणावाचा सामना
पूर्वी एका सचिवावर केवळ एक किंवा दोन सोसायट्यांचे काम असायचे. मात्र, आता एका सचिवावर ५ ते १० संस्थांचे कामकाज आहे. त्यामुळे या सचिवांना दिवस-रात्र कामात व्यस्त राहावे लागत आहे. कामाच्या प्रचंड दबावामुळे प्रत्येक गावाला स्वतंत्र वेळ देणे शक्य होत नाही, आणि परिणामी मानसिक तणाव वाढत आहे.
सचिवांची प्रमुख जबाबदारी
शेतकऱ्यांना कर्ज वाटप
कर्ज वसुली
संस्थांचे ऑनलाईन व्यवहार
दस्तऐवज अद्ययावत ठेवणे
संस्था प्रगतीपथावर नेण्यासाठी नियोजन
या सर्व जबाबदाऱ्यांमुळे सचिवांच्या कामाचा भार वाढला असून, शासनाने रिक्त पदे तातडीने भरावी अशी मागणी सचिव संघटनेने केली आहे.
