
सहसंपादक : रामभाऊ भोयर
काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या सततच्या बदलामुळे सर्दी, ताप, खोकला यासह विविध संसर्गजन्य आजारांनी जोर धरला आहे. परिणामी शहरातील खासगी व शासकीय रुग्णालये रुग्णांनी हाऊसफुल झाली आहेत. दरवर्षी पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण सुरू केले जाते, मात्र काही दिवसांनी त्याकडे दुर्लक्ष होते. अशा स्थितीत विहिरी व बोअरवेलमधून मिळणारे अशुद्ध पाणी ग्रामीण व शहरी भागात पुरवठा होऊ लागते आणि त्यामुळे आजारांची लागण वाढते. सध्या हवामानात रोजच बदल जाणवत आहे — कधी प्रखर उष्णता, तर कधी पावसामुळे अचानक गारवा. या अस्थिर हवामानामुळे ताप, हिवताप, गॅस्ट्रो यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात शेतकरी व मजूर उन्हा-पावसाची पर्वा न करता दिवसभर कामात गुंतलेले असल्याने त्यांना या आजारांचा फटका बसत आहे.खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी असून, अनेक ठिकाणी खाटांचीही कमतरता भासत आहे. विशेषतः लहान मुले व वयोवृद्ध हे आजारांना लवकर बळी पडत आहेत.
डॉ. अमोप्रकाश फुलमाळी यांचा सल्ला
“रुग्णांनी घाबरून न जाता वेळीच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार घ्यावेत. स्वतःहून औषधे घेण्याचे टाळावे,” असे डॉ. फुलमाळी यांनी सांगितले.
