
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगांव, राळेगांव, नेर, वणी, कळंब, पुसद, दारव्हा या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकी करिता प्रारूप याद्या १० नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसिध्द करुन २२ नोव्हेंबर २०२१ पर्यंतच्या कालावधीत मतदार यादीवर आक्षेप व हरकती मागाविण्यात आल्या होत्या. तथापि राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण यांचे २२ नोव्हेंबर २०२१ च्या आदेशान्वये कृषी ऊत्पन्न बाजार समितीची निवडणुक प्रक्रीया पुढील आदेशापावेतो रद्द करण्यात आलेली आहे.
प्रारूप याद्यावर मागविण्यात आलेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने २३ ते २५ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत उपनिबंधक कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आल्या होत्या. कृषी ऊत्पन्न बाजार समित्यांचा निवडणुक कार्यक्रम पुढील आदेशापावेतो रद्द करण्यात आलेला असल्यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दिनांक २३ ते २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावण्या स्थगीत करण्यात आल्या आहेत. याबाबत उपरोक्त सर्व बाजार समित्यांनी नोंद घ्यावी व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी केले आहे.
