25 फेब्रुवारी रोजी आंबेडकर चौक येथे स्वतंत्र विदर्भाचा गजर यात्रा दाखल होणार,विदर्भ प्रेमींनी हजर राहण्याचे आवाहन

             

स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी अनेक वर्षे जुनी आहे . यासाठी अनेकदा आंदोलने सुद्धा झाली आहेत . परंतु केंद्रसरकार कडून या संदर्भात कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन करणा-यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे . आता विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी दि. २१ फेब्रुवारी पासून कालेश्वर सिरोंचा येथून यात्रेला सुरवात होणार असून , ५ मार्च ला नागपूर येथे यात्रेचा समारोप करण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार अॕड वामनराव चटप यांनी यापूर्वी पत्रकार परिषदेत दिलेली आहेच . सन्माननीय माजी वि. स. उपाध्यक्ष व शेतकरी संघटनेचे पाईक राहिलेले स्व. मोरेश्वर टेमुर्डे साहेब आज आपल्यात नाहीत . ते आज आपल्यात असते तर निश्चितच वरोरा तालुक्यातील विदर्भवाद्यांना संघटीत करण्याची धुरा त्यांनीच सांभाळली असती . या आंदोलनात सहभागी होऊन ख-या अर्थाने आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत .

विदर्भातील २७ तालुके पादाक्रांत करण्यासाठी निघालेली ही स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारी निर्माण यात्रा वरोरा येथे दि. २५ फेब्रुवारीला सकाळी ०९-०० वाजता पोहचत आहे . सकाळी १०-०० वाजता वरोरा येथिल आंबेडकर चौकात या यात्रेचे भव्य सभेत रुपांतर होणार असल्यामुळे वरोरा तालुक्यातील ” तमाम शेतकरी , शेतमजूर , शिक्षक , विद्यार्थी , युवक , युवती , व्यावसायीक , पत्रकार , वरोरा वासिय नागरीक व तमाम तालुका वासियांनी या सभेत मोठ्या संख्येत उपस्थित राहून वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीचे विदर्भवासियांच्या दृष्टीकोनातून असलेले महत्व समजून घेण्यासाठी व आंदोलन पुन्हा अधिक तीव्र करता येण्यासाठी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन मी अॕड शरद कारेकार आपणास करित आहे .

संपूर्ण जगात आजपर्यंत जी आंदोलनं झालीत त्यांच्या यशस्वितेत तेथिल शिक्षकांचा , विद्यिर्थ्यांचा व पत्रकारितेचा सिंहाचा वाटा राहीलेला आहे . स्वतंत्र विदर्भाची मागणी विदर्भवासियांच्या दृष्टीकोनातून किती महत्वाची व न्याय्य आहे हे विदर्भवासियांना समजवून सांगण्याची फार मोठी जबाबदारी मी आपणावर म्हणजे शिक्षकांवर , पत्रकार बधूंवर व तालुक्यातील समस्त विदर्भप्रेमी यांच्यावर सोपवित आहे . आपण आज जागे झालो नाहीत तर आंदोलनाला पाहिजे तशी धार मिळणार नाही . म्हणून तमाम शिक्षकांना नम्र विनंती आहे की आपण शनिवार दि. २५ फेब्रुवारीला असलेली सकाळपाळीतील शाळा लगेच आटोपून शक्य तितक्या लवकर सभास्थळी पोहचावे . सभेत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे यासाठी शिक्षकांनी व पत्रकारांनी सहकार्य करावे .

१९४७ च्या अकोला करारापासून १९५३ चा नागपूर करार , १९५६ ची संविधान दुरुस्ती व वैधानिक विकास महामंडळाची तरतूद , १९६० ची महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळची समन्यायी विकासाची आश्वासने , स्वतःच समतोल विकासासाठी ( दांडेकर समिती – १९८४ , केळकर समिती – २०१३ ) समित्या नेमायच्या आणि स्वतःच त्यांचे अहवाल कुलुपबंद करायचे , स्वतःच वैधानिक मंडळे स्थापन करायची आणि आपणच त्यांच्या शिफारसी दुर्लक्षित करायच्या हे सगळे खेळ विदर्भातील जनतेने पाहिलेले आहेत . पूर्वीच्या शिलकी उत्पन्न असलेल्या प्रदेशाचे ( १९५६-२०२२ ) ६६ वर्षात सगळ्यात माघारलेला कृषी विकास , ठप्प झालेला औद्योगिक विकास व परिणामी सगळ्यात जास्त ओसाड गावांच्या प्रदेशात रुपांतर झाल्यावर तो प्रदेश ‘ अशांत ‘ नाही तर कसा असणार आहे ? दोष पश्चिम महाराष्ट्राचा किंवा उत्तर महाराष्ट्राचा नाही तर विदर्भाच्या लोकप्रतिनिधींचा आहे . ते येथिल जनतेची मतं घेऊन आपल्याच मतदारांना गरीब ठेवत आहे . दोष केंद्रीय नेतृत्वाचा आहे ज्याला विदर्भाचे दुःख माहित असूनसुद्धा अनुच्छेद ३ नुसार विदर्भाचे राज्य निर्माण करीत नाही .

स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण होण्याच्या दृष्टीकोनातून पुकारलेल्या या निर्माण यात्रेतून निश्चितच स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पुढे रेटल्या जाणार आहे . या आंदोलनात सहभागी असणा-या तमाम आंदोलकांची इतिहासात नोंद होत आहे . विदर्भातील जनतेवर होणारा अन्याय विदर्भातील जनतेनेच मुकदर्शक बनून बघत रहाण्यापेक्षा या आंदोलनात सहभागी होणे अत्यावश्यक आहे जेणेकरुन येणा-या पिढ्यांना आम्हाला सांगता येईल की विदर्भासाठी जे आंदोलन झाले त्यात आम्ही सहभागी होतो . या आंदोलनाला धार देण्यासाठी तमाम वरोरा तालुकावासियांनी दि. २५ फेब्रुवारी २०२२ ला स्थानिक आंबेडकर चौक वरोरा येथे सकाळी ९-३० वाजता उपस्थित राहून आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा . ही यात्रा वरोरा नगरीत वणी नाका वरोरा येथून प्रवेश करणार आहे . वरो-यातील तमाम विदर्भप्रेमींनी या यात्रेचे स्वागत करण्यासाठी स्वयंप्रेरणेने वणी बायपास , वणी नाका वरोरा येथे सकाळी ९-०० वाजता स्वयंप्रेरणेने उपस्थित रहावे .