
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ :- पांढरकवडा येथे आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी उद्योग जत्रा २०२६ (Tribal Trade Fair) या दोन दिवसीय कार्यक्रमाचा प्रचार सध्या वेगाने सुरू असून या जत्रेच्या प्रचाराची धुरा सामाजिक कार्यकर्ते धर्माची आत्राम यांनी उचलली आहे. गावागावात भेटी देत नागरिकांना जत्रेबाबत माहिती देत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ते करत आहेत.
क्रांतीवीर बाबुराव पुलसूर शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त २१ व २२ मार्च रोजी जनजोताई मैदान, पांढरकवडा येथे या जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी समाजातील पारंपरिक उद्योग, हस्तकला, शेतीपूरक व्यवसाय आणि विविध उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
धर्माची आत्राम हे सध्या परिसरातील गावांमध्ये जाऊन व्यापारी, शेतकरी व युवकांना जत्रेत स्टॉल लावण्याबाबत मार्गदर्शन करत आहेत. तसेच आदिवासी बांधवांनी आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करून आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल टाकावे, असे आवाहनही ते करत आहेत.
या जत्रेमध्ये विविध प्रशिक्षण सत्र, पारंपरिक नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच आदिवासी खाद्यपदार्थांचे स्टॉल नागरिकांसाठी आकर्षण ठरणार आहेत. त्यामुळे या जत्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
“आदिवासी बांधवांच्या पारंपरिक उद्योगांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने या जत्रेचा प्रचार गावागावात करत आहोत. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.”
— धर्माची आत्राम
