
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
जवाहर नवोदय विद्यालय, सेलू-काटे (वर्धा) येथे प्रवेश निश्चित; पालक, शिक्षक व सृजन इंग्लिश स्कूलकडून अभिनंदनाचा वर्षाव सृजन इंग्लिश स्कूल, देवळी येथील इयत्ता ५ वीची विद्यार्थिनी कु. वंशिका पवन पारीसे हिने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत जवाहर नवोदय विद्यालय, सेलू-काटे (जि. वर्धा) येथे प्रवेशासाठी निवड मिळविली आहे. तिच्या या यशामुळे शाळा, कुटुंब, परिसर तसेच व्यावसायिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वंशिका ही मुरमुरे-फुटाणे व्यवसाय करणारे पवन पारीसे यांची कन्या असून तिने कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळविले आहे. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही अत्यंत प्रतिष्ठेची आणि स्पर्धात्मक मानली जाते. अशा परीक्षेत यश मिळवून वंशिकाने आपल्या गुणवत्तेची छाप उमटविली आहे. या यशाबद्दल सृजन इंग्लिश स्कूलच्या संस्थापक श्रीमती श्रद्धा चोरे, प्राचार्य प्रिया वैद्य, साजिद शेख तसेच सर्व शिक्षकांनी वंशिका चे अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील असून त्याचेच हे यशस्वी फलित असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
माझी मुलगी कु. वंशिका हिने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश मिळवून आमच्या कुटुंबाचा अभिमान वाढविला आहे. तिच्या या यशामागे तिची मेहनत, जिद्द आणि सृजन इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. संस्थापक श्रद्धा चोरे मॅडम, प्राचार्य प्रिया वैद्य मॅडम, साजिद शेख आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या शैक्षणिक आधारामुळे हे यश शक्य झाले. वंशिकाने भविष्यातही अशाच प्रकारे प्रगती करत मोठे यश संपादन करावे, हीच अपेक्षा आहे.
— पवन पारीसे (पालक)
वंशिकाची नवोदय विद्यालयात झालेली निवड ही शाळेसाठी गौरवास्पद बाब आहे. तिच्या मेहनतीचे हे यश असून भविष्यात ती अधिक मोठी कामगिरी करेल, असा विश्वास आहे.
— श्रीमती डॉ. श्रद्धा चोरे (संस्थापक, सृजन इंग्लिश स्कूल)
वंशिकाने सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल. भविष्यातही ती शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करेल, असा आम्हाला विश्वास आहे.
— प्रिया वैद्य (प्राचार्य)
कु. वंशिका हिने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत मिळविलेले यश हे तिच्या अथक मेहनतीचे, जिद्दीचे आणि सातत्यपूर्ण अभ्यासाचे फलित आहे. तिची झालेली निवड ही शाळेसाठी तसेच शिक्षकवर्गासाठी अत्यंत गौरवास्पद बाब आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळून तेही आपल्या ध्येयपूर्तीसाठी अधिक जोमाने प्रयत्न करतील, असा विश्वास आहे.
–साजिद शेख (शिक्षक)
माझ्या पालकांचे, शिक्षकांचे आणि शाळेचे मार्गदर्शन व प्रोत्साहन यामुळेच मला हे यश मिळाले. भविष्यातही अधिक मेहनत घेऊन चांगले शिक्षण घेण्याचा प्रयत्न करेन.
— कु. वंशिका पवन पारीसे
