
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
बेंबळा पाटबंधारे विभाग आणि ज्ञानसाधना शिक्षण संस्था, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने वडकी येथील सोनाई पाणी वापर संस्था येथे “पाणी वापर संस्था बळकटीकरण-२५” अंतर्गत मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास परिसरातील १२ पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्ञानसाधना शिक्षण संस्थेचे प्रशिक्षक महेश मलोंडे यांनी पाणी वापर संस्थांच्या कायदेशीर जबाबदाऱ्या, अधिकार व कर्तव्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कर वसुली, पाण्याचे नियोजन, हेड-मिडल-टेल भागातील लाभार्थ्यांना न्याय्य पाणी वितरण, आउटलेट व्यवस्थापन तसेच घनमापन पद्धतीने पाण्याचे मोजमाप याविषयी त्यांनी माहिती दिली. अध्यक्ष व सचिव यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रकाश टाकला.
यानंतर संस्थेचे प्रकल्प संचालक मेघावत सर यांनी पाणी वापर संस्था स्थापनेपासून हस्तांतरण प्रक्रियेपर्यंतच्या कायदेशीर बाबी स्पष्ट केल्या. संस्था स्थापन झाल्यानंतर ९० दिवसांत करारनामा होणे आवश्यक असतानाही अनेक ठिकाणी हा करारनामा अनेक वर्षांनंतर होत असल्याची गंभीर बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. कलम २२ अंतर्गत संयुक्त तपासणी, कार्यक्षेत्राची पडताळणी व प्राथमिक यादी तयार करणे यांसारख्या प्रक्रिया नियमानुसार राबविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
मेघावत सर यांनी पुढे सांगितले की, भविष्यात प्रत्येक गावात पाणी वापर संस्थांची स्वतंत्र इमारत व कार्यालय उभारण्यात येणार असून पाणी व्यवस्थापनाशी संबंधित सर्व कामकाज तेथूनच पार पडणार आहे. यामुळे संस्थांचे सक्षमीकरण होऊन शेतकऱ्यांचा सहभाग अधिक प्रभावी होईल.
यावेळी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष सुधीरभाऊ जवादे यांनी विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे संघटित होऊन आपल्या समस्या संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडल्यास त्यावर सकारात्मक तोडगा निघू शकतो, असे मत व्यक्त केले. पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात कृषी मार्गदर्शक प्रदीप भगत यांनी “पीक पद्धतीतील बदल आणि शाश्वत शेती” या विषयावर मार्गदर्शन केले. जमिनीतील घटत चाललेला सेंद्रिय कर्ब, वाढते क्षारीकरण आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर त्यांनी प्रकाश टाकला. सेंद्रिय व जैविक खतांचा वापर वाढवून शाश्वत शेती पद्धती स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच पारंपरिक पिकांसोबत हळद, मोरिंगा यांसारख्या मूल्यवर्धित पिकांची लागवड केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
ज्ञानसाधना शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनीष भानवे आणि प्रियांका पाटील यांनी पाहिलेले शाश्वत शेती, सक्षम पाणी व्यवस्थापन आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध शेतकरी घडविण्याचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी सोनाई पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष राजूभाऊ देटे यांनी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व शेतकरी बांधवांचे आभार मानले.
या प्रशिक्षण कार्यक्रमास प्रकल्प संचालक मेघावत सर, कृषी मार्गदर्शक प्रदीप भगत, प्रशिक्षक महेश मलोंडे, सहप्रशिक्षक नंदाताई मलोंडे, सुधीरभाऊ जवादे तसेच १२ पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
