
(प्रतिनिधी) शेख रमजान
गॅस सिलिंडरसाठी ग्रामीण भागात ४५ दिवसांच्या अंतराची सक्तीची अट घालण्यात आल्याने ग्रामीण भागात तीव्र संताप व्यक्त होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमात मोठा बदल करून ग्रामीण भागातील ग्राहकांना आता एक सिलिंडर मिळाल्यानंतर दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी चक्क ४५ दिवस केले आहे तर शहरी भागासाठी हे अंतर २५ दिवस ठेवण्यात आले आहे.ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांसाठी ते थेट ४५ दिवस कशासाठी करण्यात आले ?शहरी आणि ग्रामीण नागरिकात भेदभाव का?
अनेक मध्यमवर्गीय आणि मोठ्या कुटुंबांना एक गॅस सिलिंडर जेमतेम २५ ते ३० दिवसच पुरतो. अशा वेळी उर्वरित १५ ते २० दिवस स्वयंपाक कसा करायचा, असा संतप्त सवाल ग्रामीण नागरिक विचारत आहेत.
“शहरात छोटी आणि विभक्त कुटुंबे असतात, तिथे दोन-तीन लोकांसाठी कमी गॅस लागतो. मात्र, ग्रामीण भागात आजही पाच ते दहा लोकांची एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात आहे. अशा वेळी दिवसातून तीन-चार वेळा मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करावा लागतो, ज्यामुळे गॅसचा वापर शहरांपेक्षा जास्त होतो,” तसेच, वाढत्या महागाईमुळे सिलिंडरच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी नाईलाजाने लाकडाचा वापर करावा लागतो, याचा अर्थ ग्रामीण भागाला गॅसची गरज कमी आहे असा होत नाही,”३० दिवसांत गॅस संपला तर पुढचे १५ दिवस उपाशी राहायचे का?” असा प्रश्न विचारत महिलांनी ही ४५ दिवसांची अट त्वरित रद्द करून २५ दिवसाची करण्याची मागणी केली आहे. शासनाने केवळ रिफिलिंगच्या आकड्यांवरून निष्कर्ष न काढता, ग्रामीण कुटुंबांची गरज आणि तिथल्या लोकसंख्येचा विचार करून नवीन सर्वेक्षण करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
