रेतीची चोरी करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडला,मारेगाव महसूल विभागाने सुरु केली रात्रीची गस्त

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

रेतीची चोरी करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडून ट्रॅक्टर मालकावर दंडात्मक कार्यवाही केल्याचे प्रकरण २४ नोव्हेंबरला उघडकीस आले आहे. वाळूमाफियांकडून रेती चोरीचा उद्योग सुरूच असल्याचे महसूल विभागाला कळल्यानंतर मारेगावचे मंडळ अधिकारी यांनी दांडगाव रस्त्यावर शोध मोहीम राबविली. २३ नोव्हेंबरला रात्री दरम्यान राबविलेल्या या शोध मोहिमेत मंडळ अधिकाऱ्यांना ११.४५ वाताच्या सुमारास दांडगाव रस्त्यावरून एक ट्रॅक्टर येतांना दिसला. त्यांनी सदर ट्रॅक्टरला थांबवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये रेती आढळून आली. ट्रॅक्टर चालकाकडे रेती वाहतुकीचा परवाना अथवा रॉयल्टी नसल्याने तो चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक करीत असल्याचे स्पष्ट झाल्याने मंडळ अधिकाऱ्यांनी रेती भरलेला ट्रॅक्टर ताब्यात घेऊन कार्यवाही केली. मारेगाव परिसरात वाळूमाफियांकडून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी केली जात असल्याच्या तक्रारी महसूल विभागाच्या कानावर आल्या. महसूल विभागाने परिसरातील रस्त्यांवर शोध मोहीम राबविण्याचे ठरविले. २३ नोव्हेंबरला मारेगाव तालुक्यातील दांडगाव रस्त्यावर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गस्त घातली असता त्यांना रात्री ११.४५ वाजता MH २९ BP ०१३७ क्रमांकाचा ट्रॅक्टर त्या मार्गाने येतांना दिसला. त्यांनी ट्रॅक्टर थांबवून टट्रॅक्टरची तपासणी केली असता त्यांना ट्रॉली मध्ये रेती भरलेली दिसली. चालकाकडे रेतीचा कुठलाही परवाना आढळून आला नाही. या ट्रॅक्टरमध्ये १ ब्रास रेती भरलेली होती. अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर मंडळ अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला. सदर ट्रॅक्टर हा शशिकला संभाजी घुमे यांच्या मालकीचा असल्याचे अधिकाऱ्यांना तपासात आढळून आले. ट्रॅक्टर मालकाच्या वतीने विनोद गणपत आंबेकर रा. दांडगाव यांनी लेखी जबाब नोंदवून रेती चोरीची जबाबदारी स्वीकारली. त्यावरून महसूल विभागाने १ ब्रास रेती किंमत ६००० रुपये व त्याच्या पाच पट दंड एकूण ३० हजार रुपये, ट्रॅक्टर किंमत १ लाख रुपये, रॉयल्टी ४०० रुपये असा एकूण १ लाख ३० हजार ४०० रुपयांचा दंड ट्रॅक्टर मालक शशिकला संभाजी घुमे यांच्यावर ठोठावला. सात दिवसाच्या आत दंडाची रक्कम अदा न केल्यास व्याजासह दंड वसुलल्या जाणार असल्याचेही महसूल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मारेगाव महसूल विभागाच्या रात्रीच्या गस्तीने वाळूमाफियांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहे.