सावित्रीबाई फुले स्मृतिदिनी ‘महिला प्रबोधन’ कार्यक्रम,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचारमंच, काटोल

स्त्रियांचे आरोग्य विचारावर अवलंबून आहे – डॉ.रूपाली भालेराव

तालुका प्रतिनिधी/११मार्च
काटोल – महिलांच्या आरोग्याचे मूळ तिच्या आहारावर व विचारावर अवलंबून असते.महिलांनी उत्तम आरोग्य किंवा आळस यापैकी एकाची निवड करावी.दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने केली तर संपूर्ण दिवस आनंददायी जातो.म्हणून जीवनात नकारात्मक विचार बाजूला सारत सकारात्मकतेची कास धरा व निरोगी रहा असा संदेश डॉ.रुपाली भालेराव यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचारमंच, काटोल द्वारा आयोजित ‘महिला प्रबोधन’ कार्यक्रमात कार्यक्रमात महात्मा फुले सभागृहात दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रजनी तिजारे , मार्गदर्शक म्हणून डॉ.रुपाली भालेराव व वर्षा ढोले तर प्रमुख अतिथी म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचारमंचाच्या अध्यक्ष वैशाली डांगोरे, सचिव अँड.भैरवी टेकाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
महिला सक्षमीकरण याविषयावर बोलतांना आदर्श शिक्षिका वर्षा ढोले म्हणाल्या, रिक्षा चालकापासून तर अंतरिक्षापर्यत स्त्रियांमध्ये घडवून आलेले परिवर्तन हेच खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण आहे.आर्थिक,राजकीय, सामाजिक व औद्योगिक प्रत्येक क्षेत्रात महिलांची उंच भरारी घेतली आहे.स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचे स्वातंत्र्य जेव्हा स्त्रियांना मिळते तेव्हा ती सक्षम झाली असे समजावे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड.भैरवी टेकाडे, संचालन प्रतिभा भेलकर तर आभार प्रदर्शन सुनिता कांबळे यांनी केले.यावेळी मोहना खरबडे यांनी स्त्री मुक्तीवर अप्रतिम गीत सादर केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रजनी नेरकर, वैशाली श्रीखंडे ,मंगला श्रीखंडे, सुवर्णा पवार, अर्चना वरोकर, कविता कांडलकर, कांचन टेंभे , मोहना खरबडे आदींनी सहकार्य केले.