
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक मुख्य प्रवाहाशी जोडण्याबरोबरच डिजिटल व्यवहारांची सवय लागावी आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने राळेगाव तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या ‘डिजिटल सखी’ प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अफार्म पुणे व फिनास्टरा यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या डिजिटल वित्तीय समावेशन कार्यक्रम अंतर्गत रावेरी येथे ही बैठक पार पडली.
दिनांक ६ मार्च २०२६ रोजी रावेरी येथील सीतामाता प्रशिक्षण हॉलमध्ये आयोजित या बैठकीस तालुक्यातील १५ गावांतील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि डिजिटल सखी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटल व्यवहार, आर्थिक साक्षरता आणि विविध शासकीय योजनांबाबत जागरूक करण्यासाठी पुढील कालावधीतील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी कृषी सहाय्यक अधिकारी वानखडे मॅडम तसेच कृषी सहाय्यक अधिकारी किनवटकर मॅडम यांनी शेतकऱ्यांसाठी असलेल्या AI Aap आणि Maha-DBT योजनांबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा संसाधन व्यक्ती सुमित राऊत यांनी PMFME योजनेची माहिती देत ग्रामीण भागातील लघुउद्योगांना मिळणाऱ्या संधींचा आढावा घेतला. राळेगाव पोस्ट ऑफिसच्या अधिकारी तन्वी ठक मॅडम व पोस्टमास्तर वनकर सर यांनी पोस्ट ऑफिसच्या विविध बचत व गुंतवणूक योजनांची माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी रावेरीचे ग्रामसेवक विनोद उमरतकर, ग्रामपंचायत सदस्य हनुमान डाखोरे, डिजिटल सखी प्रकल्पाचे प्रोजेक्ट मॅनेजर राहुल पडोळे, क्लस्टर मॅनेजर अभिजित भगत तसेच अधिनाथ चलवाड सर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत १५ गावांमध्ये डिजिटल सखींच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामीण नागरिकांमध्ये भीम UPI, आधार पे तसेच विविध विमा योजनांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी डिजिटल सखींची भूमिका अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला. तसेच ग्रामीण भागात भेडसावणाऱ्या नेटवर्कच्या समस्या आणि तांत्रिक अडचणींबाबत चर्चा करून त्यावर उपाययोजना सुचविण्यात आल्या.
पुढील काही महिन्यांत या १५ गावांना पूर्णतः डिजिटल साक्षर बनवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. ग्रामीण भागाच्या सक्षमीकरणासाठी ‘डिजिटल सखी’ प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिजिटल सखी प्रियंका मनोज वाकुलकर यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील तसेच विविध गावांतील डिजिटल सखी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
उपस्थित डिजिटल सखीमध्ये जयश्री शेंडे (वाटखेड), शालिनी आत्राम (एकलारा), मनीषा पोटे (जळका), शीतल कांबळे (जळका), भाग्यश्री कुरवाडे (वरणा), पायल हिवरकर (पिंपरी), स्वाती रामटेके (पिंपळखुटी), अश्विनी कांबळे (आष्टा), प्रिया सातपुते (सोनुर्ली), आश्विनी फाले (गुजरी), वंदना येवतकर (रावेरी) आणि प्रतिभा सातपुते (कृष्णापूर) यांचा समावेश होता.
ग्रामीण भागात डिजिटल साक्षरतेची चळवळ अधिक बळकट करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
