

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
अंगावर शहारे आणणारी गोटमार
मारेगाव, तालुक्यातील प्रसिद्ध असलेली बोरी (गदाजी) येथील गोटमार यात्रा होळीच्या शुभमुहूर्तावर भरत असून या यात्रेतील गोटमार बघायला दूरदूरून भाविक बोरी येथे येत असतात. अंगावर शहारे आणणारी ही यात्रा दरवर्षी रंगपंचमी या दिवशी भरत असून ती अनेकांचे आकर्षण बनलेली आहे.
तालुक्यातील प्रसिद्ध असलेले बोरी येथील गदाजी महाराज यांच्या पावनभूमीमध्ये होळीच्या पर्वावर या यात्रेचे आयोजन केले जाते. बोरी येथे संत गदाजी महाराजांचे समाधीस्थळ आहे. त्या खालून पाण्याचा अखंड झरा वाहत होता अशी माहिती आहे. सकाळी कबड्डी सामना खेळला जातो. बाद झालेल्या एका गड्याची प्रेतयात्रा संपूर्ण गावात फिरवल्यानंतर काही वेळातच गोटमारीला सुरवात होते.
यामध्ये सुमारे 40 ते 50 होळकर भाग घेतात. पटांगणात व बुरुजावर अगोदरच गोट्यांचे ढीग लावलेले असतात. बुरुजावरील व पटांगणात असलेल्या होळकरांमध्ये गोटमार चालू असताना एखादा गावकरी दगड लागून मूर्च्छित पडला की ही गोटमार थांबते. या संपूर्ण खेळात गावकरी गदाजी महाराजांचा जयजयकार करीत असतात. नंतर मूर्च्छित झालेल्या गावकर्याला मंदिरात नेण्यात येते. त्या ठिकाणी मंदिराचा पुजारी त्याला अंगारा लावतो. काही वेळाने हा व्यक्ती बरा होतो. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आजही सुरू आहे.
गोटमार बघण्यासाठी विदर्भ तसेच नजिकच्या राज्यांतून भाविक येत असतात. आज शुक्रवार रोज दि. 18 मार्च रोजी सकाळी गोटमार व त्यानंतर काला करण्यात आला होता भाविक भक्तांनी गोटमार यात्रा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
