
सहसंपादक: रामभाऊ भोयर
रावेरी येथे दैनिक पब्लिक पोस्टचे संपादक प्रा. अंकुश वाकडे व सौ. प्रिया वाकडे यांचा आज राळेगाव तालुक्यातील ऐतिहासिक रावेरी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. रावेरी हे तालुक्यातील पहिल्या इतिहासकालीन गावांपैकी एक असून, त्या गावाच्या प्रदर्पण व माहिती सादरीकरणाच्या निमित्ताने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी रावेरी ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र तेलंगे व उपसरपंच गजेंद्र झोटिंग यांच्या हस्ते संपादक दांपत्याचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी रावेरी गावाचा ऐतिहासिक वारसा, सामाजिक रचना, विकासाची वाटचाल, ग्रामपंचायतीचे उपक्रम तसेच गावातील विविध समस्या व संधी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.दैनिक पब्लिक पोस्टने ग्रामीण भागातील प्रश्न, लोकशाही मूल्ये, सामाजिक जाणीव आणि विकासात्मक विषय सातत्याने मांडून समाजप्रबोधनाचे महत्त्वाचे कार्य केले असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. ग्रामीण पत्रकारितेच्या माध्यमातून गावागावातील प्रश्न शासन व प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य पब्लिक पोस्ट करत असल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.या कार्यक्रमास राळेगाव तालुका प्रतिनिधी मनोहर बोभाटे, रावेरी ग्रामपंचायत सचिव, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण स्नेहपूर्ण व उत्साहपूर्ण असून, गावाच्या इतिहासाला उजाळा देणारा हा सोहळा ग्रामस्थांसाठी अभिमानास्पद ठरला.
