
सहसंपादक : रामभाऊ भोयर
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत रावेरी येथे मंदार पत्की (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ तसेच युवराज म्हेत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी विशेष भेट देऊन ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध विकासात्मक उपक्रमांची सखोल पाहणी करून सर्वंकष आढावा घेतला. या भेटीमुळे रावेरी ग्रामपंचायतीत राबविण्यात येणाऱ्या कामांना अधिक बळ मिळाले असून शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानाला स्थानिक पातळीवर गती मिळाली आहे.
या भेटीच्या प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायत रावेरी कार्यालयास भेट देऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आतापर्यंत पूर्ण झालेली तसेच प्रगतीपथावर असलेली कामे, लोकसहभागातून राबविण्यात आलेले उपक्रम, स्वच्छता, पाणीपुरवठा, ग्रामविकास नियोजन आदी बाबींची सविस्तर माहिती घेतली. ग्रामपंचायत प्रशासनाने सादर केलेल्या कामकाजाच्या अहवालाचे त्यांनी कौतुक करताना ग्रामविकासात पारदर्शकता व लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे नमूद केले.
यानंतर अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रावेरी येथे भेट देऊन शैक्षणिक सुविधा, वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, डिजिटल शिक्षण तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची पाहणी केली. शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम पिढी घडविणे हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच युवा भवन व ग्राम वाचनालयास भेट देऊन युवकांसाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. युवकांनी शिक्षणासोबतच कौशल्य विकास, वाचनसंस्कृती व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. वाचनालय व युवा भवनाचा अधिकाधिक उपयोग करून गावात सकारात्मक परिवर्तन घडवावे, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.
या भेटीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे महिला बचत गटांशी झालेला संवाद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी महिला बचत गटांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधून त्यांच्या बचत, उत्पादन, विपणन तसेच आर्थिक अडचणींबाबत माहिती घेतली. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणामुळेच गावाचा खऱ्या अर्थाने विकास शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिला बचत गटांनी स्वयंरोजगार, उद्यमशीलता व आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने पुढे जावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अभियानाच्या अनुषंगाने ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना अधिकाऱ्यांनी स्वच्छ, सुंदर व हरित गाव, जलसंधारण, लोकसहभागातून विकासकामे, शेतीपूरक व्यवसाय, शिक्षण व आरोग्य या विषयांवर विशेष भर देण्याचे सांगितले. प्रशासन, ग्रामपंचायत व नागरिक यांचा समन्वय मजबूत झाल्यास मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अधिक प्रभावीपणे राबविता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी भारती इसळ सहाय्यक गटविकास अधिकारी, सागर विटाळकर, बालविकास अधिकारी, नवनाथ लहाने, गट शिक्षणाधिकारी, मनीषा भोयर, कृषी अधिकारी, अविनाश पोपळकर, विस्तार अधिकारी (पंचायत), दीपक मस्के, विस्तार अधिकारी (पंचायत), विश्वकर्मा शिवणकर, विस्तार अधिकारी (शिक्षण), श्री दाभाडे, विस्तार अधिकारी (शिक्षण) तसेच पर्यवेक्षिका धरती कोराम, स्नेहा अनपट व पायल आत्राम उपस्थित होत्या. विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती यावेळी सादर करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत रावेरीचे सरपंच श्री. राजेंद्र तेलंगे, उपसरपंच श्री. गजानन झोटिंग, ग्रामपंचायत अधिकारी श्री. विनोद उमरतकर, मुख्याध्यापक श्री. राजेंद्र एकोणकर तसेच ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीमुळे ग्रामपंचायत रावेरी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सुरू असलेल्या विकासकामांना नवे बळ मिळाले असून गावाच्या सर्वांगीण, शाश्वत व लोकसहभागातून होणाऱ्या विकासाला अधिक चालना मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
