
सहसंपादक: रामभाऊ भोयर
जुन्या रुढी-परंपरांना फाटा देत समाजामध्ये प्रबोधनातून सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न सोजाई (सप्तश्रुंगी)आदिवासी महिला विकास फाउंडेशन तर्फे पुण्यात करण्यात आला आहे. विधवा महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करत अनोखा संदेश देण्यात आला आहे.
महिलांना दिला मान – सन्मान
पतीच्या निधनानंतर अनेक महिलांवर मोठी कौटुंबिक जबाबदारी येत असते. विधवा म्हणून त्यांना अनेकदा विविध कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी मर्यादा लावल्या जातात. प्रथा परंपरांच्या नावाखाली विधवा महिलांना वेगळी वागणूक दिली जाते. या प्रथांना फाटा देत विधवा म्हणून समाजाच्या प्रवाहापासून दूर राहणाऱ्या१०८ महिलांचा सोजाई (सप्तश्रुंगी)आदिवासी महिला विकास फाउंडेशन तर्फे हळदी कुंकवाने मान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. वाण म्हणून भगिनींना साडी व भारतीय संविधान प्रत देण्यात आली. मकर संक्रांतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आल्या.
यावेळी संस्थेच्या सचिव अँड.जयश्री सोनवणे म्हणाल्या स्त्री स्वतःच एक शक्तिपीठ आहे.एक स्री सर्व प्रथम आपल्या कुटुंबाची शिल्पकार असते. ती एक मुलगी, एक पत्नी त्यानंतर एक माता या महत्वाच्या तीन भूमिका बजावते. त्यानंतर नात्यांच्या भूमिका आयुष्याबरोबर बदलत जातात. संस्कारातून समाज घडवणारी स्री ही आपल्या जोडीदाराला गमावल्यानंतर मात्र, एकटी पडते. स्री स्वतःच एक शक्ती पीठ आहे. एखाद्या स्रीवर जर दुर्दैवाने वैधव्य आले तर त्यामध्ये तिचा कोणता दोष? स्रीला वैधव्य आले तर तिच्याशी दुजाभावाने वागणूक दिली जाते. तिला शुभ कार्यात दुय्यम दर्जा दिला जातो. सोजाई (सप्तश्रुंगी)आदिवासी महिला विकास फाउंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या पूर्णांगिनी (विधवा) महिलांच्या या हळदीकुंकू सोहळ्यात अनेक महिलांना गहिवरून आले. तर अनेकींना अश्रू अनावर झाले.
एकीला दुजाभावाचा अनुभव
एका महिलाभगिनीने सांगितले की, गेली १८ वर्ष ती हा दुजाभावाचा अनुभव घेत आहे. खूप लहान वयात वैधव्य आले. त्यानंतर इतक्या वर्षानंतर असा मान सन्मान प्रथमच कुणी तरी देत आहे. या भावनेने अश्रूला वाट मोकळी करून दिली.
यावेळी सोजाई (सप्तश्रुंगी)आदिवासी महिला विकास फाउंडेशन अध्यक्ष डॉ. प्रशांत चव्हाण म्हणाले की,मान सन्मानातून तिच्या कर्तृत्वाचा गौरव झाला पाहिजे.”अनेक महिला डॉक्टर, प्राध्यापक तसेच उच्च शिक्षित असून केवळ विधवा असल्यामुळे त्यांचे कार्यकर्तृत्व झाकोळले गेले. तिच्या सामाजिक सन्मानासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.
त्यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. ओमकार चव्हाण म्हणाले की सर्वप्रथम अशा महिलांना विधवा नाही तर पूर्णागिनी महिला म्हणावे. तिला मानसिक बळ मिळावे आणि तिचे कर्तृत्व समाजासमोर यावे, या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला.”
यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी,अध्यक्ष डॉ. प्रशांत चव्हाण,अँड.जयश्री सोनवणे डॉ.ओंकार चव्हाण,दत्तात्रय चव्हाण,द्रोपती सोनवणे,लताबाई चव्हाण,संगीता बोरुडे तसेच अनेक पूर्णांगिनी महिला यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.
