
वरोरा : शेतातील मोटार पंप आणि केबल चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा वरोरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
वणी येथील दोन सराईत चोरांना अटक करून त्यांच्याकडून चोरीला गेलेला ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शेतकरी
वर्गात समाधानाचे वातावरण आहे. तालुक्यातील एकार्जुना येथील शेतकरी रितीक संजय थेरे आणि त्यांच्या शेजाऱ्यांच्या शेतातील दोन मोटार पंप व केबल, असा एकूण ६९ हजार रुपयांचा माल २३ जानेवारी रोजी चोरीला गेला होता. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच ठाणेदार अजिंक्य तांबडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले.
सपोनी शरद भस्मे आणि त्यांच्या पथकाने शेताकडे जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी वणीच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने मागोवा घेत वणी (जि. यवतमाळ) येथील गोकुळनगर येथून सीताराम आसाराम भिसे आणि सुनील रामप्रसाद साळुंखे या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीला गेलेले ६० हजार रुपये किमतीचे दोन पंप आणि ९ हजार रुपयांची केबल जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली स पोनी शरद भस्मे, दिलीप सुर, संदीप मुळे, विशाल राजुरकर, महेश गाव तुरे आणि सौरभ कुलथे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
