काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांना मातृशोक 102 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या मातोश्री सुमित्राबाई गोविंदराव ठाकरे यांचे आज रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास वार्धक्यामुळे निधन झाले. सुमित्राबाई यांनी वयाच्या 102 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.
दारव्हा तालुक्यातील हरू या गावातील सुमित्राबाई ठाकरे यांनी पुत्र माणिकराव ठाकरे यांच्या आयुष्याला खरे वळण दिले. कणखर भूमिका, स्वभावातील बाणेदारपणा त्यांनी आयुष्यभर जोपासला होता. शेतीवर त्यांचे जीवापाड प्रेम होते. वार्धक्य अवस्थेतही त्या शेतात नित्याने जायच्या. गावात त्यांचा आदरपूर्वक दरारा होता. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी गावाशी आपली ‘नाळ’ जोडून ठेवली होती. मुलगा माणिकराव ठाकरे यांनी राजकीय क्षेत्रात नवनवी यशाची शिखरे पादाक्रांत केल्यानंतरही त्यांनी कधीच जगण्यातला साधेपणा सोडला नव्हता. अनेकवर्ष माणिकराव ठाकरे यांचेकडे मंत्रिपद, पक्ष संघटनेत प्रदेशाध्यक्षपदासारखी धुरा, विधानपरिषदेचे उपसभापतिपद असतानाही त्यांचा गावातील लोकांसोबत असलेला जिव्हाळा कायम होता. राजकारणातील व्यस्ततेतूनही माणिकराव ठाकरे आपल्या आईच्या सेवेत रमायचे. अलीकडे वृद्धापकाळामुळे त्या कुटुंबातच रमल्या होत्या. वयाची नाबाद शंभरी पार केल्यानंतर गत दोन वर्षांपासून त्या पूर्णत: थकल्या होत्या. आज रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास त्यांनी यवतमाळातील निवासस्थानी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या पश्‍चात पुत्र माणिकराव ठाकरेंसह तीन मुली, जावई, नातू जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, अतुल ठाकरे अशा बराच मोठा आप्तपरिवार आहे.


हरू या मूळगावी होणार अंत्यसंस्कार
माणिकराव ठाकरे यांच्या मातोश्री सुमित्राबाई गोविंदराव ठाकरे यांनी कायम आपल्या हरू या गावाशी नाते जपले. त्यामुळे हरूमध्येच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. सोमवारी 21 मार्चला सकाळी 10 वाजता हरू येथील निवासस्थानातून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.