दिलासा संस्था, घाटंजी मार्फत शेतकरी गटांच्या सदस्यासाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

बजाज आलियांज जनरल इन्शुरन्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या लोक सह्भागातून कृषी व उपजीविका विकास कार्यक्रम अंतर्गत व दिलासा संस्था, घाटंजी मार्फत सेंदीय शेती पद्धती विषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, त्याविषयी शेतकर्‍यांचे ज्ञान वाढवणे, शेतीसाठी लागणारा खर्च कमी करून उत्पादन वाढविणे व पारंपारिक गावरान बियाणे बीज बँकचे महत्व याविषयी माहिती देण्यासाठी तसेच प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या प्रमुख उद्देशाने राळेगाव क्लस्टर मधील लोहारा, एकलारा, शिवरा, श्रीरामपूर कू्ष्णापूर, पिंप्री दूरग, मांडवा, सोयटी, कोपरी, इंझापूर, वालधूर, चिकना व दापोरी या एकूण 13 प्रकल्प गावातील सेंद्रीय शेती गटातील शेतकऱ्यांच्या अभ्यास दौरा भेटीचे आयोजन मार्च २०२२ या महिन्यामध्ये जहागीरपूर ता. तिवसा, आणि भिली ता. धामणगाव व नांदुरा जि. अमरावती येथे करण्यात आले होते.
या अभ्यास दौरा भेटीमध्ये दिलासा टीम सदस्यांसह एकूण 178 सदस्य सहभागी झाले होते. गाव भिली ता. धामणगाव येथे श्री. रमेश साखरकर यांनी पारंपारिक गावरान बियाण्याची बीज बँक तयार करून त्यामध्ये जतन करून वेगवेगळ्या २७२ प्रकारच्या भाजीपाला व पिकांच्या गावरान बियाण्याचे महत्व, उत्पादन व त्याची गरज याबाबत माहिती दिली. जहागीरपूर येथील श्री. माधव गिरी फार्म यांच्या शेतीला भेट दिली असता, त्यांनी शेतकऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती संकल्पना, सेंद्रिय शेतीची गरज, सेंद्रिय शेती कार्यपद्धती, खरीप नियोजन पूर्वतयारी व रासायनिक शेतीचे दुष्टपरिणाम, शेतीला हातभार लावण्यासाठी शेतीशी संबंधित व्यवसाय, तसेच सेंद्रिय शेती करताना रसायनाचा वापर न करता केवळ शेतातील पिकांचे अवशेष, शेण, गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती कशी करता येते याबाबत माहिती दिली. त्यांनंतर सेंदीय शेती चर्चा सत्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तरे देऊन त्यांच्या शंकाचे निरासरण करण्यात आले.
नैसर्गिक साधनाचा वापर करून आपल्या घरीच वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशक औषधे, घन व तरल खते कशी तयार करता येतात, त्याचे फायदे व प्रमाण याबाबत सेंद्रिय शेती अभ्यासक श्री. पवनकुमार मिश्रा यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली व प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. शेती टिकविण्यासाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यास रासायनिक खतांवर व औषधांवर होताना खर्च वाचू शकतो हे यामधून उपस्थित शेतकऱ्यांच्या लक्षात आले.
त्यानंतर श्री. गिरी यांच्या शेतामध्ये सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेले संत्रा आंबा, चिकू, खिरणी, सफरचंद, पँपनस, चायनीज पेरू, वाटर अँपल, स्टार फ्रुट, पँशन फ्रुट व रब्बी पिक – खपली गहू, काळा गहू, बारीक चना, लसण, कांदे तर मसाला पिकामध्ये मोहरी, विलायची, लवंग, मेथी, सर्पगंध अशा विविध प्रकारचे व ४२ जातीचे फळ झाडे -पिके तसेच माती व पाणी याच्या संवर्धनसाठी केलेले विविध उपचार राबविल्यामुळे पाण्याची पातळी कशाप्रकारे वाढविली, विहीर पुनर्भरणच्या माध्यमातून कशाप्रकारे सिंचनासाठी पाणी साठवण करण्यात आली हे दाखवून त्याचा उपयोग व सेंद्रिय मालाची बाजारपेठेमध्ये मागणी बाबत महत्व सांगितले. सेंद्रिय उत्पादनांच्या वापरामुळे सर्व फळ झाडांची, पिकांची निरोगी वाढ आणि जास्त उत्पादन व कमी खर्च सर्व शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात पाहिले.
गोकुलम गोरक्षण संस्था, नांदुरा जि. अमरावती येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिरामध्ये जगप्रसिद्ध बन्सी गिर गोशाळा अहमदाबाद्चे संस्थापक मा. श्री. गोपालभाई सुतारीया यांनी गाईचे महत्त्व, त्यापासून तयार होणारे उत्पादन, ‘गोकृपा अमृत’ कल्चरचे वैज्ञानिक, आर्थिक व सामाजिक महत्व तसेच गोकृपा अमृत शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये तयार करण्याची विधी, कोणत्या पिकावर कशा पद्धतीने वापर करावा, गोकृपा अमृत वापरल्याने रासायनिक खते व कीटकनाशके वापरावी लागत नाही. त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च कसा कमी होतो, जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता वाढते, शेतकऱ्याचा आर्थिक व मानसिक तान कमी होतो यासारख्या अनेक विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
भेटीदरम्यान, शेतकऱ्यांच्या लक्षात आले की, सेंद्रीय शेतीमध्ये योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे खर्चामध्ये बचत होऊ शकते तसेच उत्पादनांमध्ये प्रक्रिया किंवा मूल्यवर्धन केल्याने चांगले परतावा मिळू शकतो. अभ्यास दौऱ्यामधील सहभागी शेतकरी सदस्यांनी आणि दिलासा प्रतिनिधी यांनी श्री. रमेश साखरकर , श्री. माधव गिरी व श्री. गोपालभाई सुतारीया यांच्या केलेल्या कार्याचे कौतुक केले. व आम्ही सुद्धा शेतकरी प्रकल्पाच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये सेंद्रीय शेती करण्यास सुरवात करू अशी हमी दिली.
अभ्यास दौऱ्याचे आयोजन प्रशांत धनोकार यांनी केले तर अभ्यास दौरा यशस्वी होण्यासाठी , बालाजी कदम, भाग्यश्री पाटील यांनी मदत केली.