देवधरी घाटात आंतरराज्यीय गोवंश तस्करीचा पर्दाफाश,२६ लाखांचा मुद्देमाल जप्त; ट्रकचालक पसार

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

नागपूर येथून वडकीमार्गे अदिलाबाद येथे गोवंश घेवून जाणारा ट्रक पोलिसांनी देवधरी घाटात अडविला. यावेळी पोलिसांनी २६ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे पुन्हा एकदा आंतरराज्यीय गोवंश तस्करीचा पर्दाफाश झाला आहे.

वडकी पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग ४४ वरून गोवंश तस्करी करण्यात येते. छत्तीसगड, नागपूरमधून तेलंगणा व आंध्र प्रदेशात जनावरांची निर्दयपणे वाहतूक करण्यात येत आहे. दरम्यान देवधरी घाटातून गोवंशाची ट्रकद्वारे वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घाटात सापळा रचला. यावेळी एम. एच. ४० वाय ९०८२ क्रमांकाचा ट्रक येताना दिसला. पोलिसांनी सदर ट्रकला अडविले. पाहणी केली असता ट्रकमध्ये १६ गोवंश जातीचे जनावरे आखूड दोरीने पाय बांधून, चारा, पाण्याची व्यवस्था न करता आढळून आले. यावेळी ट्रकचा चालक पसार झाला. पोलिसांनी सहा लाख ४० हजारांची जनावरे आणि २० लाखांचा ट्रक असा एकूण २६ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई एसपी डॉ. दिलीप पाटील भुजबळ, एसडीपीओ प्रदीप पाटील यांचा मार्गदर्शनात वडकी ठाणेदार विनायक जाधव, विकास धडसे, किरण दासरवर, विकास धावर्तीवार, विनोद नागरगोजे, विलास जाधव यांनी केली.