
राळेगाव पंचायत समीती अंतर्गत येत असलेल्या वडकी परिसरात शासकीय लालफितशाहीच्या धोरणामुळे शासनाच्या ‘शेत तिथे पांदण रस्ता’ या योजनेचा पार फज्जा उडाला आहे. अनेक वृत्तपत्रात या विषया बाबत अनेक वृत्त प्रसिद्ध झाले परंतु शासन व प्रशासन अधिकारी याकडे जाणीवूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहेत. गेल्या वर्षीपासून पावसाने वर्षभरही उसंत न घेतल्याने त्यात तर आणखीनच भर पडली. आता शेतात जायचे कसे, शेतात निघालेले उत्पादन बाजारात न्यायचे कसे, असा फार मोठा प्रश्न पावसााल्यामध्ये समोर उभा राहतो. राळेगाव तालुक्यातील वडकी परिसरातील शेतशिवरात पावसाळ्याच्या दिवसात वडकी परिसरातील पांदण रस्ते चिखलमय होत असल्याने शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी त्रास सोसावा लागतो. ग्रामीण भागात मुख्य रस्त्यांची दुरावस्था झाली तिथे पाणंद रस्त्याचे काय असा सवाल उपस्थित होत आहे. पण शेतीसाठी चांगला रस्ता असल्यावर शेतीमाल वाहतूकीचा तसेच अत्याधुनिक यंत्रे शेतात घेऊन जाता यावीत या उद्देशाने मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजना राबवली जात आहे. त्याअनुशंगाने राज्य सरकारने प्रस्तावही मागवून घेतले. शिवाय रस्ते कामांना मंजुरीही मिळाली आहे. मात्र, प्रत्यक्षात अजून कामाला सुरवातच झाली नाही. शेतकऱ्यांची परवड ही सुरुच आहे. पण यंदाच्या पावसाळ्यापूर्वी तरी ही कामे पूर्ण होणार की नाहीत हा प्रश्न कायम आहे. पांदण रस्त्याच्या खडीकरणाची मागणी वारंवार करूनही समस्या सुटली नाही. राळेगाव तालुक्यातील वडकी परिसरातील शेतशिवारात जाण्यासाठी वडकी ते खैरी, वडकी ते सवित्री पिंपरी, झुल्लर ते कोच्ची, वडकी ते कारेगाव, खडकी- पिंपळापुर- वडगाव, खडकी ते लाडकी, खडकी ते झुल्लर व इतरही पाणंद रस्ते आहे. मात्र देखभाली अभावी वडकी परिसरातील बऱ्याच पांदण रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असल्याने शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत. शेतातील उत्पादित माल व शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीचे होईल याकरिता पाणंद रस्त्यांचा उपयोग होतो. मात्र या पांदण रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हे रस्ते पायवाट म्हणून अजुनही वापरले जात आहेत. वडकी परिसरात पाणंद रस्त्यावर मोठ- मोठे खड्डे पडले असून पाण्याच्या डबक्यातून शेतकऱ्यांना वाट काढावी लागत आहे. पावसाळ्यात पाणंद रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून पांदण रस्त्याच्या दुरूस्तीकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.परिणामी वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. येथे मुरूम टाकून नुतनीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. लवकरात लवकर या पाणंद रस्त्याची दुरुस्ती करावी आणि शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
आम्हाला जमिनीची मशागत करण्यापासून ते मालाचा शेवटचा दाणा घरी आणेपर्यंत शेतात ये-जा करावी लागते. ही वहिवाट उपलब्ध पांदण रस्त्यावरून होते. परंतू पावसाळ्यात या पांदण रस्त्यावर पाणी साचून चिखल तयार होतो. चिखलातून साधे पायदळ जायचे असले तरी एक दोन फूट खोल चिखल तुडवीत जावे लागते. शेती अवजारे, बी बियाणे, रासायनिक खते आदी साहित्य डोक्यावर वाहून न्यावे लागते. यामुळे या वस्तू नेण्यात शक्ती खर्च होत असल्याने दिवसभर शेतातील मेहनतीचे कामे करायची कशी, असा प्रश्न निर्माण होतो.
सोमेश्वर पिपराडे, (शेतकरी तसेच तंटामुक्ती अध्यक्ष वडकी)
मातोश्री पांदन रस्ते योजने अंतर्गत ३२ किमी अंतराचे पांदन रस्ते मंजुर करण्यात आले आहेत . त्या परीसरातील जे पांदन रस्ते असतील ते पुर्ण करण्यात येईल तसेच पांदन रस्ते देखभालीचा आढावा घेण्यात येईल.
डॉ. रविंद्र कानडजे, तहसीलदार राळेगाव
