
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव येथील पोलीस ठाण्यामध्ये झाडगाव बीटचे अंमलदार म्हणून कार्यरत असलेल्या जमादाराने एका गुन्ह्यात दोन हजाराची लाच मागितली. यासंदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्राप्त झाली. त्यावरून मंगळवारी सापळा रचून या जमादाराला एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले.
भगवान मेश्राम असे लाच घेताना सापडलेल्या जमादाराचे नाव आहे. लोणी बंदर येथील अदखलपात्र गुन्ह्याचा तपास मेश्राम यांच्याकडे होता. आरोपीला संरक्षण देण्यासाठी त्याने दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यासंदर्भात एसीबीचे निरीक्षक ज्ञानेश्वर नालट यांच्याकडे तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीची एसीबी पथकाने पडताळणी केली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी राळेगाव पोलीस ठाणे परिसरात सापळा लावण्यात आला. पंचांसमक्ष जमादार भगवान मेश्राम यांनी लाच स्वीकारण्याचे मान्य केले. त्यावरून एसीबी पथकाने मेश्राम यांना तत्काळ ताब्यात घेतले. मेश्राम यांना ताब्यात घेऊन एसीबीचे पथक राळेगाव विश्रामगृहावर पोहोचले. तेथे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत जबाब नोंदविण्याची कार्यवाही सुरू होती. यासंदर्भात राळेगाव पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाणार आहे. ही कारवाई उपअधीक्षक शैलेंद्र सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर नलाट. महेश वाकोडे आदींनी केली.
