
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
बेंबळा प्रकल्पाने हेड पासून तर टेल पर्यंत जमीन ओलिताखाली येणार शेतकरी सुजलाम -सुफलाम होणार हे स्वप्न दाखविले मात्र शेतकरी तर संपन्न झालाच नाही, कालव्यात पाणी तर आलेच नाही उलट शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी येण्याची वेळ आली आहे
राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथील गट नंबर ३५० क्षेत्रफळ २ हेक्टर २० आर मधून बेंबळा प्रकल्पाचे अर्धवट झालेल्या कामामुळे तेजस लक्ष्मण दांडेकर या युवा शेतकऱ्याचे दहा लाख रुपयांचे नुकसान होऊन शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
शेताचे पूर्व सीमेला उत्तर दक्षिण बेंबळा प्रकल्पाचे मायनर अर्धवट स्थितीत काम झाले आहे. सदर मायनर चे काम करीत असताना बेंबळा प्रकल्पाचे अधिकारी यांनी शेतातील झाडे बांधी मध्ये टाकल्याने बांधीवर केलेला पूल व पुलाकरिता वापरण्यात आलेल्या क्षेत्रांमध्ये कचरा निर्माण झाला असल्यामुळे दांडेकर या शेतकऱ्यांनी कालवे विभाग यवतमाळ इंजिनियर साहेब यांना वारंवार फोन द्वारे चर्चा केली असता उडवा उडवीची उत्तरे मिळाली असता इंजिनिअर यांनी दांडेकर या शेतकऱ्याला अरेरावीची भाषा करत उडवा उडविची उत्तरे दिली.
सदर मायनरचे अपूर्ण काम पूर्ण करण्याकरिता व भविष्यात नुकसान होऊ नये म्हणून तेजस दांडेकर या शेतकऱ्यांने दिनांक ८ मार्चला मुख्य कार्यकारी अभियंता बेंबळा विभाग यवतमाळ, तहसीलदार राळेगाव, उपअभियंता बेंबळा कालवे विभाग राळेगाव, अधीक्षक अभियंता यवतमाळ पाटबंधारे प्रकल्प मंडळ अधिकारी यवतमाळ यांना लेखी स्वरुपात निवेदन दिले असताना अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही.
दिनांक ९ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे व बेंबळा प्रकल्पाचे कर्मचारी यांचे हलगर्जीपणामुळे तेजस दांडेकर यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचे दोन हेक्टर वरील पूर्णतः नुकसान झाल्याने त्यांच्या सुपीक जमिनीचे किमान दहा लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करून आर्थिक मदत देण्यात यावी व राहिलेले अपूर्ण काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी शेतकरी तेजस लक्षमन दांडेकर यांनी केली आहे.
