शेतकऱ्यांचा अश्रूंचा बांध फुटला; पिकांचे नुकसान थांबेना,कपाशी, सोयाबीन पिके पडताहेत पिवळी : शेतकऱ्यांची चिंता वाढली, पिकांमध्ये तण वाढत असल्याने फवारणीसह निंदणचा खर्च वाढला आहे.

तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

जुलैच्या सुरुवातीपासून राळेगाव तालुक्यासह वडकी परिसरात जोरदार पाऊस सुरु झाला. त्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले. शेतामध्ये तलावाचे स्वरूप दिसून येत होते. आता पावसाचा जोर कमी आहे. मात्र, पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने पिकामध्ये पाणी कायम आहे. परिणामी, पिंके पिवळी पडू लागली असून, वडकी परिसरातील काही भागातील पिके करपली आहेत. त्यामुळे पिकांच्या नुकसानीला थांबा मिळताना दिसून येत नाही. पिकांमध्ये तण वाढत असल्याने शेतकरी हैराण झाले असून, आता शेतकऱ्यांना फवारणीसह निंदणचा खर्च अधिक करावा लागणार आहे.

नदी आणि नाल्याच्या काठावर असलेल्या अनेक शेतातून पाण्याचे पाट वाहत होते. त्यामुळे जमिनी खरडवल्या गेल्या असून जमिनीची उत्पादन क्षमता ही कमी होण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे. चारच दिवसात महिनाभराचा पाऊस वडकी परिसरात पडला होता. सरासरी पेक्षा अधिक पाऊस सात दिवसात जवळपास कोसळला होता. महिनाभराचा पाऊस तीन ते चार दिवसांमध्ये झाला. त्यामुळे जमिनीवर असलेले पीक मातीमोल झाले आहेत. परिसरातील दुबार पेरणी अगोदर झाली होती. आता अनेकाकडे तिबार पेरणीसाठी पैसेच नाहीत.

यंदा अगोदर पावसाने हुलकावणी दिल्याने आणि नंतर मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे वडकी परिसरात तब्बल हजारो हेक्टरवरील पिके मातीमोल झाले आहेत. कृषी विभागाने केलेल्या पाहणीत नुकसानीचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशा सकट काळात शासनाकडून शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील राजधानीमध्ये प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, या काळात बहुतांश दिवस जिल्ह्यासह तालुक्यातील लोकप्रतिनिधीचा मुंबईतच मुक्काम होता. मागील आठवड्यात जोरदार पावसामुळे शेतीचे नुकसान झाले असतांना खासदार, आमदार मात्र आपल्या राजकीय भविष्याच्या चिंतेत होते. त्यामुळे बळीराजाला वाऱ्यावर सोडल्याचे दिसून आले. सततच्या पावसाने शेतशिवारात गुडघाभर पाणी साचले असून आता तिबार पेरण्यांची वेळ आली आहे. मागील पंधरवाडयात सलग परंतु तिसरी वेळेस पेरणीसाठी अनेक शेतकन्यांकडे आता खडकू देखील राहिला नाही. राळेगाव तालुक्यासह वडकी परिसरात मागील सलग वीस दिवस झालेल्या पावसाने परिसरातील नादी, नाले, ओढे ओसंडून वाहत होते. त्यामुळे पेरणी केलेले सर्व वाया गेले. या पावसाचा फटका तालुक्यासह वडकी परिसराला बसला आहे.


              प्रतिक्रिया

यंदा चांगले उत्पादन होईल या आशेने खरीपात मोठ्या प्रमाणात कापूस, सोयाबीन, तूर पिकांची लागवड केली. पीक डवरणीला आले असताना अचानक नाल्याला पूर आला. काही कळायच्या आत पुराने अक्षरश: पिकच वाहून गेले. पीक असलेल्या शेतात आता काहीही उरले नाही. हाती पैसा नसल्याने पुन्हा शेती कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने नुकसान झालेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी.

  • शुभम प्रभाकर खंडाळकर, पूरग्रस्त युवा शेतकरी, वडकी