आश्रमशाळा अधीक्षकाचा अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवतअत्याचार; आरोपी अटकेत

मुलीची प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत शाळा प्रशासनाने तिला परत घेऊन जाण्याची सूचना पालकांना केली. त्यानुसार मुलीला घेऊन पालक त्याच दिवशी हिंगणघाटला आले.
तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील एका आश्रमशाळेचे अधीक्षक संजय एकनाथ इटनकर यास अटक करण्यात आली.

पिडीतेचे पालक चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असून काही महिन्यांपूर्वी हिंगणघाट शहरात राहायला आलेत. त्यांनी आपल्या मुलीला चंद्रपूर जिल्ह्यातील एक निवासी आश्रमशाळेत शिकण्यासाठी पाठवले होते. दरम्यान, मुलीची प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत शाळा प्रशासनाने तिला परत घेऊन जाण्याची सूचना पालकांना केली. त्यानुसार मुलीला घेऊन पालक त्याच दिवशी हिंगणघाटला आले. घरी आल्यावर प्रकृतीची विचारपूस केली असता मुलीने आपल्यासोबत घडलेला अनुचित प्रकार कथन केला. यानंतर पालकांनी मुलीला उपजिल्हा रुग्णालयात नेले. वैद्यकीय तपासणी झाली. त्यात मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हिंगणघाट पोलिसांनी ३७६ व पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करीत इटनकर यास अटक केली.