शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग, गहू हरभरा काढण्याची धांदल

सहसंपादक: रामभाऊ भोयर

यावर्षी निसर्गाने शेतकऱ्यांवर वक्रदृष्टी केली असून खरीपातही शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून त्यातून सावरत तालुक्यातील शेतकऱ्यांनी उधारी उसनवारी करून रब्बीची पेरणी केली असतांना हात तोंडाशी आलेला घास ही हिरावून नेणार की काय अशी भीती शेतकऱ्यांना निर्माण झाली असून निसर्ग शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयारच नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे गहू, हरभरा उत्पादकांमध्ये चिंता वाढली आहे. तालुक्यतील काही शेतकऱ्यांचा गहू हरभरा निघाला तर काही शेतकऱ्यांनी हरभरा व गहू पीक शेतात सोंगून ठेवले आहे तर काहींच्या शेतात अजूनही पिक उभेच आहे परंतु, अवकाळी पावसाचे संकट आल्याने शेतकऱ्यांवरही चिंतेचे ढग आले आहेत.
गत दोन ते तीन वर्षांपासून शेतकरी दुष्काळाच्या छायेत आहेत. आपल्या जवळील जमापुंजी गोळा करून शेतात भर उन्हात जिवाचे रान करून मेहनत घेतली. परंतु, कधी अत्यल्प पावसाने, तर कधी अति पावसाने शेतकऱ्यांच्या हातचा घास हिरावला गेला आहे. आता रब्बी हंगामासाठी लागलेल्या खर्चाने शेतकऱ्यांवर उधार-उसनवारीची वेळ येऊन ठेपली आहे त्यात ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हतबल झाला आहे शेतातील सांगून ठेवलेला हरभरा गहू घरापर्यंत सुरक्षित जाईल की नाही चिंता शेतकऱ्यांना आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते उधारी उसनवारी करून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिके घेतली आहे त्यात आता ढगाळ वातावरणामुळे सौंगून ठेवलेला गहू हरबरा या पिकांवर मोठे संकट शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभे ठाकले आहे.

गहू, हरभरा पीक धोक्यात

तीन चार दिवसापासूनच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे गहू, हरभरा पिके धोक्यात सापडली आहेत. शेतात सोंगून ठेवलेला गहू, हरभरा जमा करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ दिसून येत आहे. त्यामुळे यंदाचा हंगामसुद्धा दुष्काळाच्या छायेत जाण्याची चिंता अनेक शेतकऱ्यांना आहे. वातावरणातील बदलामुळे बळीराजा धास्तावला आहे.