ढाणकी शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ


ढाणकी शहरात आठवडी बाजार परिसरात असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरातील त्यांच्या 103 व्या जयंतीच्या निमित्ताने प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी त्यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये सुद्धा अण्णाभाऊंचा महत्त्वाचा आणि सिंहाचा वाटा होता.
त्याकाळी व्यवस्थेवर व अन्यायावर बोलणे फारच कठीण होते तरीपण एवढे कठीण धनुष्य हाती घेऊन भाऊंनी होत असलेल्या अन्यायावर आपल्या लेखणीतून सडकून टीका करणे सोडले नाही. कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शिक्षण नसताना अण्णाभाऊंचे साहित्य हे अत्यंत प्रबळ होते त्यांच्या एकूण ३६ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्य, ११ पोवाडे, आणि ३ नाटके व शेकडो गाणी लावण्या छकडी अशी भरमसाठ साहित्य संपदेला जन्म दिला वैजयंती कादंबरीत सर्वात प्रथम तमाशा काम करणाऱ्या ज्या कलावंत स्त्रिया होत्या त्यांच्या शोषणाचे वास्तव सत्य मांडले .माकडीचा माळ ही भटक्या विमुक्त समाजाबद्दल चे अतिशय बारीकपणे चित्रण करणारी देशातील पहिली कादंबरी आहे. तसेच छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्याच्या माध्यमातून पोहोचवले व नंतर रशियन भाषेमध्ये त्याचे भाषांतर झाले आणि रशियन राष्ट्रअध्यक्षांकडून त्यांचा यथोचित सत्कार व सन्मान देखील झाला अशा या हरहुन्नरी शाहीरांच्या कादंबरीकाराच्या जयंतीला असंख्य अनुयायी उपस्थित होते.